तीन लाखांवर जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर!
By Admin | Updated: June 9, 2016 01:58 IST2016-06-09T01:58:08+5:302016-06-09T01:58:08+5:30
अकोला जिल्ह्यात चारा डेपो केव्हा उघडणार याबाबत शेतक-यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

तीन लाखांवर जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर!
संतोष येलकर / अकोला
दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, ३ लाख १४ हजार ८९७ जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी प्रशासनामार्फत चारा डेपो केव्हा उघडले जाणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे उत्पादन बुडाले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाईसह चारा टंचाई निर्माण झाली. सन २0१२ च्या पशुगणनेनुसार, जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय लहान ७४ हजार ७0२ आणि मोठे २ लाख ४0 हजार १९५ असे एकूण ३ लाख १४ हजार ८९७ पशुधन आहे. नापिकीच्या स्थितीत चारा उत्पादनाच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना जगविण्यासाठी चारा आणणार कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील गावागावांत शेतकर्यांपुढे निर्माण झाला. चारा नसल्याने शेतकर्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील विविध भागात जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठीचारा डेपो उघडण्याची उपाययोजना प्रशासनामार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पशुसंवर्धन विभाग प्रस्ताव केव्हा सादर करणार?
जिल्ह्यातील विविध भागात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असला तरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या दाव्यानुसार, जून अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे; परंतु गावागावांत निर्माण झालेल्या चाराटंचाईची स्थिती बघता, टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा डेपो उघडण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे केव्हा सादर करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.