धारदार शस्त्रांसह तिघे गजाआड
By Admin | Updated: September 1, 2014 01:36 IST2014-09-01T01:36:29+5:302014-09-01T01:36:56+5:30
अकोला जिल्ह्यातील भौरद गावात धारदार शस्त्रांसह तिघे गजाआड; आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश.

धारदार शस्त्रांसह तिघे गजाआड
अकोला: धारदार शस्त्रांसह दोन युवक व एका महिलेला भौरद गावातून अँन्टी गुंडा स्क्वॉड व डाबकी रोड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून धारदार चाकू, खंजीरसह एक बनावट पिस्तूलसुद्धा जप्त केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अँन्टी गुंडा स्क्वॉडला दोन युवक व एक महिला शस्त्रांसह भौरद गावामध्ये आल्याची माहिती मिळाली. स्क्वॉडने जुने शहर पोलिसांच्या मदतीने भौरदमधील एका घरावर छापा घालून नागपुरातील संजय गांधीनगरात राहणारा जुगनू ज्ञानेश्वर वानखडे (३0), वणी तालुक्यातील राजसा भोंगसा गावातील प्रमोद अरुण गेडाम (३१) आणि मूळची भौरदची व सध्या नागपूर येथे राहणारी दीपाली समाधान इंगळे (२८) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ कुकरी, २ खंजीर, १ रामपुरी चाकू आणि १ बनावट पिस्तूल जप्त केली. तसेच रोख ५0 हजार, तीन सोन्याच्या अंगठय़ा आणि एमएच ३0 पी १७८६ क्रमांकाची इंडिका कारसुद्धा जप्त केली. ही कारवाई डाबकी रोडचे एपीआय प्रवीण धुमाळ, अँन्टी गुंडा स्क्वॉडचे महेंद्र बहादूरकर, असद खान, विलास बंकावार, शक्ती कांबळे, खुशाल नेमाडे, हेकाँ मोगरे, भारत इंगळे, शेख अनिस, अनिस पठाण, मनीषा सिरसाट आदींनी केली.
*आरोपींनी रेल्वेमध्ये लुटमार केल्याचा संशय
पोलिसांना अटक केलेले आरोपी हे रेल्वेमध्ये लुटमार करीत असल्याचा संशय आहे. त्यांनी रेल्वेतील प्रवाशांना शस्त्रांच्या धाक दाखवून ५0 हजार रुपये, सोन्याच्या अंगठय़ा लुटल्या असाव्यात. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची चौकशी केल्या जाईल. चौकशीमधून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
*खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून लुटायचे
आरोपींकडून जप्त केलेल्या धारदार चाकू, खंजीरसोबतच एक खेळण्यातील पिस्तूलसुद्धा मिळून आली. आरोपी खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून लुटमार करीत असावे, असा संशय पोलिसांना आहे. या खेळण्यातील पिस्तूलची किंमत दोन ते अडीच हजार रुपये आहे.
*भौरदच्या महिलेचे नागपूर कनेक्शन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या महिलेने तिच्या पतीला घटस्फोट न देता सोडून दिले आणि नागपुरातील जुगनू वानखडे याच्यासोबत सूत जुळवले आणि ती त्याच्यासोबत पत्नीसारखी राहते. ती भौरद येथील तिच्या नातेवाईकाकडे आली होती.
*ती कार पोलिस पुत्राची
आरोपींकडून पोलिसांनी जप्त केली इंडिका कार ही एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या मुलाची असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच मोहम्मद समीर याने ही कार आरोपींना सव्वा लाख रुपयांमध्ये विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी ही कार मो. समीर कडून घेतल्याचे सांगितले.
*आरोपी अटक करूनही गुन्हा दाखल करण्यास उशीर
पोलिसांनी तिघा आरोपींना सकाळी ९ वाजताच भौरद गावातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त केले. त्यांची चौकशीही करण्यात आली. आरोपींना सकाळी पोलिस ठाण्यात आणून बसवून ठेवण्यात आले; परंतु त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नाही. मग ९ ते १0 तास पोलिसांनी वेळ का दवडला. या प्रकरणामधून पोलिसांना काही साध्य तर करायचे नव्हते ना, असा सूर पोलिस कर्मचार्यांमध्ये उमटला होता. गुन्हा उघडकीस आल्यानंतर लगेच गुन्हा दाखल करण्याचा नियम आहे; परंतु पोलिसांनी निर्थक वेळ वाया घालविला.