अज्ञात तापाने तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-11T23:46:06+5:302014-05-12T00:08:18+5:30
शेलसूर येथे आढळले ४ डेंग्यूसदृश रोगाचे रुग्ण

अज्ञात तापाने तिघांचा मृत्यू
सिंदखेडराजा : तालुक्यातील मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या हिवरागडलिंग येथे अज्ञात तापाने तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून, प्रत्येक घरात एक रुग्ण तापाने फणफणत आहे. तर आतापर्यंत २0 बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिवरागडलिंग येथे ५ मे पासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण सुरू झाली आहे. ग्रा. पं. सदस्य तुळशिराम मानतकर यांची मुलगी कु. पल्लवी मानतकर (८) हिला ५ मे रोजी ताप आली. तिला साखरखेर्डा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू तिच्या पेशी कमी झाल्याने डॉक्टरांनी तात्काळ औरंगाबाद येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिथे भरती केल्यानंतर ताप आटोक्यात न आल्याने या बालीकेचा मृत्यू झाला. त्यानंतर यादवराव संभाजी जाधव (७0) आणि ब्रम्हानंद दगडु खरात (४७) यांचाही तापाने ७ मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतू प्राथमिक आरोग्य विभागाने याला दुजोरा दिला नाही. ८ मे पासून मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे यांनी वैद्यकिय पथकासह हिवरागडलिंग गावात तळ ठोकले असून, पाण्याचे नमुने घेणे, रक्ताची तपासणी करणे, धूर फवारणी, रुग्ण तपासणी कार्यक्रम हाती घेतला. परंतू, रक्तातिल पांढर्या पेशी कमी झाल्या, की अधिक याची तपासणी शासकीय यंत्रणेकडे नसल्याने हिवरागडलिंग येथील वैभव श्रीकृष्ण खरात (१४), आकाश डिगांबर साबळे (७) हे दोघे औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. तसेच राहूल विजय मानतकर (१८), जगदेव दगडू साबळे, शिल्पा देविदास गवई, सरिता देविदस गवई, सुप्रिया देविदास गवई, अक्षय दिलीप खरात, सार्थक अंबादास खरात, क्षितीज देव्हडे, युवराज सुरेश मानतकर, राहुल सरेश गवई, पवन संतोष वायाळ यांच्यासह १ ते १८ वर्षातिल २0 मुले तर काही वयोवृद्ध खामगांव, चिखली, मेहकर, बुलडाणा, जालना येथे उपचार घेत आहेत. हिवरागडलिंग आणि हनवतखेड या दोन गावांचे अंतर २ किमी असून हनवतखेड येथेही तापाची साथ सुरू आहे. आरोग्य विभागाने तपासणी शिबिर ११ मे रोजी घेऊन राजण, ड्रम, हौद रिकामा करण्याचा कार्यक्रम राबविला. परंतू ग्राम स्वच्छता राबविण्यास ग्राम पंचायतचा पुढाकार दिसून आला नाही. घराच्या शेजारी कचर्यांचा ढिगार, रत्याने वाहनारे घाण पाणी, उघड्यावर शौचास बसणे यामुळे डासांचे मोठय़ाप्रमाणात प्रदुषण येथे दिसून येते. हिवरागडलिंग व हनवतखेड येथे बुलडाणा येथील पथकाने भेट देऊन तापाच्या लक्षणाचे नमुने घेतले आहेत. गटविकास अधिकारी चंद्रशेखर चेके यांनीही दोन्ही गावाला भेट दिली. तसेच ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याच्या सुचना दिली. सरपंच गजानन मानतकर यांनी जातीने लक्ष घालून यंत्रणा राबविली. परंतू हनवतखेड येथे सचिव आणि सरपंचाचे दूर्लक्ष दिसून आले. आरोग्या विभागाने साथ आटोक्यात आणन्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
** शेलसूर येथे आढळले ४ डेंग्यूसदृश रोगाचे रुग्ण
शेलसूर : शेलसूर येथे गेल्या आठवड्यापासून डेंग्यू सदृष्य रोगाची लागण झाली आहे. सर्व प्रथम शेलसूर येथील ग्रामपंचायत सदस्य विष्णू रिंढे यांची मुलगी कु.किरण विष्णू रिंढे, वैभव जनार्धन कापसे यांना डेंग्यू सदृष्य तापाची लागण झाली. परंतु त्यांची प्रकृती आता सुधारत असून त्यानंतर लगेच गावातील ग्राम शिक्षण समितीचे सदस्य गजानन मारुती रिंढे यांना सुद्धा तापाची लागण झाली. त्यांनी चार दिवस चिखली येथे उपचार घेतल्या नंतर त्यांना अखेर औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तर चौथा रुग्ण अतुल दिलीप काळे याला सुद्धा डेंग्य सदृष्य तापाची लागण झाल्याने त्याला बुलडाणा येथील मेहेत्रे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. सदर साथीचे कारण गावातील नाल्याची साफसफाई वर्षातून एकदाच करण्यात येते असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रा.पं.ने गावातील नाल्याची साफसफाई करुन व पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचींग पावडर टाकावी अशी मागणी गावकरी करीत आहे. शेलसूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कोणताही कर्मचारी निवासस्थानी राहत नसल्यामुळे डेंग्यू सदृष्य तापाच्या साथीने थैमान घातले आहे. यासंदर्भात आ.राहुल बोंद्रे यांनी आरोग्य विभागाला तातडीने आदेश देवून सुद्धा आतापर्यंत आरोग्य विभागाचे पथक गावात आलेले नाही. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने याकडे त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.