पाणीपट्टी भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत
By Admin | Updated: August 14, 2014 02:05 IST2014-08-14T01:45:56+5:302014-08-14T02:05:20+5:30
अकोला मनपाकडे १ कोटी ८0 लाख थकीत : पाटबंधारे विभागाने बजावली नोटीस

पाणीपट्टी भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत
अकोला : शहराला करण्यात आलेल्या पाणीपुरठय़ाचे जुलैअखेरचे १ कोटी ७९ लाख ९६ रुपये महापालिकेकडे थकबाकीत आहे. या पाणीपट्टीच्या या थकित रकमेचा भरणा करण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने मनपाला दिली आहे. तीन दिवसांत पाणीपट्टी न भरल्यास जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून अकोला शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी दिला आहे.
महान येथील काटेपूर्णा धरणातून पाटबंधारे विभागामार्फत अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत महानगरपालिकामार्फत काटेपूर्णा धरणातून पाण्याची उचल केली जाते. बिगर सिंचन पाणी वापरासाठी पाटबंधारे विभागामार्फत महानगरपालिकेकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सन २0११ पासून जुलै २0१४ पर्यंत १ कोटी ७९ लाख ९६ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा भरणा मनपाकडून करण्यात आला नाही. थकीत असलेल्या या पाणीपट्टी रकमेचा भरणा १२ ऑगस्टपर्यंंत करण्याबाबतची नोटीस अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि.म. लोळे यांनी मनपा आयुक्तांना ७ ऑगस्ट रोजी पाठविली आहे. पाणीपट्टीची थकबाकी १२ ऑगस्टपर्यंत जमा करण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने मनपाला दिली होती. या मुदतीत आणि त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंतही मनपा प्रशासनाकडून थकबाकीचा भरणा करण्यात आला नाही.