अकोल्यातील तीन उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: October 14, 2014 23:19 IST2014-10-14T23:19:07+5:302014-10-14T23:19:07+5:30
अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारास ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस.

अकोल्यातील तीन उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस
अकोला: पेड न्यूज प्रकरणी अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकार्यांनी रविवारी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, यासंदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.
जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीकडे पेड न्यूज संदर्भात अकोला पश्चिम मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्याविरुद्ध दोन प्रकरणे, याच मतदारसंघातील शिवसेनेचे गुलाबराव गावंडे आणि अकोला पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक प्रकरण दाखल करण्यात आले. या तीनही उमेदवारांविरुद्ध दाखल असलेली पेड न्यूजची प्रकरणे जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीमार्फत पुढील कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तिन्ही उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका प्रकरणात विजय देशमुख यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाले असल्याची माहिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख यांनी दिली.