अकोला: कौलखेड चौकातील नाकाबंदीदरम्यान खदान पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमध्ये साडेतीन लाख रुपये किमतीची विद्युत तार मिळून आली. ही तार चोरीची असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. कौलखेड चौकामध्ये खदान पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक असलम खान पठाण हे नाकाबंदी करीत होते. यादरम्यान चौकामधून वाशिम येथून एमएच २0 बीटी ३५६३ क्रमांकाचा ट्रक शहराकडे येत होता. पोलिसांनी ट्रक थांबविला आणि ट्रकमधील रिजवान नाजीम खान(२१, रा. कमलापूर, औरंगाबाद), शकील खान गुलाब खान (४८, रा. जुना बैजीपुरा, औरंगाबाद), शेख आवेस शेख बाबू (२४, रा. बदनापूर, जि. जालना), मन्नान शेख हबीब शेख (३४) आणि गुलाब रब्बानी साहेद अली (३१, दोघेही रा. मालदा, पश्चिम बंगाल) यांची चौकशी केली. पाच जणांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३.५0 टन वजनाची विद्युत तार मिळून आली. पोलिसांनी ट्रकसहित विद्युत तार ताब्यात घेतली आणि खदान पोलीस ठाण्यात आणली. आरोपींची खदान पोलीस ठाण्यात परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांची चौकशी केली असता, त्यांनी विद्युत तार खरेदी केली असल्याचा दावा केला. पोलिसांनी विद्युत तार खरेदीची कागदपत्रे तपासले; परंतु त्यांचे समाधान झाले नाही. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४१८ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार छगनराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल धनभर, किशोर सोनोने यांनी केली.
साडेतीन लाख रुपयांची चोरीची विद्युत तार जप्त
By admin | Updated: February 5, 2016 02:09 IST