तीनही आरोपींना पुन्हा नेले घटनास्थळावर
By Admin | Updated: November 14, 2015 02:24 IST2015-11-14T02:24:26+5:302015-11-14T02:24:26+5:30
इंटक भवनमध्येही तपासणी, आज करणार न्यायालयात हजर

तीनही आरोपींना पुन्हा नेले घटनास्थळावर
अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील तीनही आरोपींना जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा घटनास्थळावर नेले. या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तीनही आरोपींनी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांना पुन्हा खाली हात परतावे लागले. बालाजी मॉलच्या आर्थिक वादातून किशोर खत्री यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप रणजितसिंह चुंगडे, राजुसिंह मेहेर व अंकुश चंदेल या तिघांवर असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक करण्यात आली. यामधील चुंगडे व मेहेर यांना आधीच घटनास्थळावर नेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; मात्र आरोपींकडून काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. त्यानंतर गुरुवारी अंकुश चंदेल याला अटक केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा या तीनही आरोपींना सोमठाणा शेतशिवारातील घटनास्थळावर नेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीनही आरोपींनी माहिती देण्यास असर्मथता दर्शविल्याने पोलीस त्यांना परत घेऊन आले. त्यानंतर इंटक भवन येथे पुन्हा तपासणी केली मात्र, या ठिकाणीही पोलिसांना काही आढळले नाही. पोलिसांनी या तिघांकडून कुण्या आरोपीने, कोणत्या शस्त्रांनी किशोर खत्री यांच्यावर हल्ला चढविला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी सदर प्रकार आम्हाला माहितीच नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना खाली हात परतावे लागले. या तीनही आरोपींची शनिवारी पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.