विक्की खपाटे खुनातील तिसरा आरोपी गजाआड
By Admin | Updated: July 1, 2017 00:38 IST2017-07-01T00:38:11+5:302017-07-01T00:38:11+5:30
कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने तिसरा आरोपी राजू काटोलेस शुक्रवारी अटक केली

विक्की खपाटे खुनातील तिसरा आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हरिहरपेठेतील रहिवासी तथा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विक्की अशोक खपाटे (३२) याच्या खूनप्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने तिसरा आरोपी राजू काटोलेस शुक्रवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हरिहरपेठेतील गाडगे नगरातील रहिवासी विकास खपाटे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने झालेल्या वादातून योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. खपाटे हा गाडगे नगरात असताना सोमवार, २६ जून रोजी दुपारी त्याच्यावर चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांनी आपसी वादातून धारदार कुऱ्हाड व लोखंडी पाइपने हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेला विक्की रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून येताच, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता, तर परिसरातील काही युवकांनी जखमी अवस्थेतच विकासला खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. यामधील करण साहू आणि नितीन साहू या दोन आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली होती तर राजू काटोले हा फरार होता. याला शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने अटक केली असून, चवथ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी चार नावे आली समोर
या प्रकरणात सुमीत मोहोकार, बंटी सटवाले, रोशन ताकवाले आणि गुंजन कावडे ही चार नावेही समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या चार जणांचा खून प्रकरणात समावेश आहे की नाही, यासंदर्भात पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.