इतर पक्षांच्या उमेदवारांचाही विचार
By Admin | Updated: July 10, 2014 01:29 IST2014-07-09T23:40:19+5:302014-07-10T01:29:41+5:30
मनसेची बैठक : शेगाव येथे प्रवीण दरेकर यांचा गौप्यस्फोट

इतर पक्षांच्या उमेदवारांचाही विचार
शेगाव: बुलडाणा जिल्ह्यात ७ पैकी ४ विधानसभा क्षेत्रांसाठी मनसेकडे सक्षम उमेदवार आहेत. इतर ३ मतदारसंघांसाठी इतर पक्षांचेही काही सक्षम उमेदवार संपर्कात असून, त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा आमदार प्रविण दरेकर यांनी बुधवारी येथे केला.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार चाचपणीचे काम मनसेने हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी बुलडाणा जिल्ह्यातील इच्छुक उम्मेदवारांची चाचपणी शेगावात करण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. इतर पक्षांच्या उमेदवारांचा विचार होऊ शकणारे ते तीन विधानसभा मतदारसंघ कोणते, संभाव्य उमेदवार कोण असतील हे योग्यवेळी जाहीर केले जाईल, असेही दरेकर म्हणाले. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट तयार केली आहे. ती लवकरच जनतेसमोर आणण्यात येईल. त्यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा दर्शवताच पक्षात उत्साह संचारला असून, कार्यकर्ते कामाला लागला आहेत. मोदी ईफेक्ट लोकसभेपुरताच कायम होता. सत्तारूढ झाल्यानंतर मोदींनी जनतेची घोर निराशा केली, असा आरोप त्यांनी केला. रेल्वे बजेट निराशाजनक असून, विदर्भ आणि बुलडाणा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. खामगाव जालना मार्ग प्रलंबीत असून, या जिल्ह्याचे खासदार अर्थसंकल्पीय सभेला सभागृहात अनुपस्थित राहतात, ही दुर्भाग्याची बाब आहे असा आरोप दरेकर यांनी केला.