अभयारण्यातील २२ पुरातन तलाव आटले
By Admin | Updated: July 8, 2014 21:52 IST2014-07-08T21:52:25+5:302014-07-08T21:52:25+5:30
आकोटनजीक सातपुड्यातील डोंगरदर्यामध्ये असलेले २२ पुरातन तलाव व इतर पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

अभयारण्यातील २२ पुरातन तलाव आटले
आकोट: आकोटनजीक सातपुड्यातील डोंगरदर्यामध्ये असलेले २२ पुरातन तलाव व इतर पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले, झरे कोरडे पडले आहेत. बांधलेले पाणवठे लवकर आटत आहेत. जंगलात प्रखर उन्हाळा असल्यागत वातावरण आहे. जनावरांची संख्यापाहता मुबलक पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी ग्रामीण वस्तीकडे धाव घेतआहे. ग्रामीण भागातील वस्त्यामध्ये तसेच शेतीवर वन्यप्राणी पोहचत असल्याने मान्सूनपूर्व लागवड केलेली पिकेसुद्धा फस्त केल्या जात आहे. त्यामुळे लवकर पाऊस न पडल्यास सातपुड्यातील प्राण्यांचे अधिवास क्षेत्रात बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भटकलेल्या वाघासह इतर वन्यप्राण्यांची शिकार होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभागातील नरनाळा, वान, अंबाबरवा या रेंजमध्ये ६ वाघ, ९ बिबटे, १६ अस्वल, २ नीलगायी, २ सांबर, १५ तडस, १७ रानकोंबड्या, २१ मोर, २२ रानडुक्कर, ५ रानहेले, १0८ लंगुर, ७ कोल्हे, हरिण व इतर विविध ८00 जनावरांचा कमी-जास्त समावेश असल्याची वन विभागात दप्तरी नोंद आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर प्राण्याकरिता सोईचा समजल्या जातो. या जंगलात विविध प्रकारचे खाद्य वनसंपत्ती असल्याने १५0 पक्ष्यांच्या निरीक्षण नोंदी झाल्या आहेत. स्वर्गीय नर्तक, रानपिंगळा, पोपटसारख्या दुर्लक्षित पक्ष्याची नोंद असून, जमिनीलगत वावरत असणार्या झुडपी दुर्लावसह सर्प, गरुड, घार, शिकरा, पिंगळा, मैना, भोरडी, राघू, दयाळ, टिटवा खंड्या, किरकुकू, तुरेवाला वृक्षीय अबाबिल, चातक, रानखाटीक रानरातवा आदी पक्ष्यांचा जंगलातील आकाशात स्वच्छंद संचार असतो. विशेष म्हणजे या भागात दुर्मीळ पक्षी आढळत आहेत.या अभयारण्यात दरवर्षी ५00 ते ९00 मिमी पाऊस पडतो; परंतु अद्यापही पाऊस पडला नसल्याने जंगलात वन्यप्राण्यांनी गाववस्ती तसेच पोपटखेड धरण व वान धरणनदीकडे पाण्याकरिता भटकंती सुरू केली आहे. लवकरच पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.