अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार!
By संतोष येलकर | Updated: September 29, 2023 17:57 IST2023-09-29T17:56:00+5:302023-09-29T17:57:29+5:30
चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार!
संतोष येलकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, अकोला: जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित असल्याने, या मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार असल्याची माहिती अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. शरद जावळे यांनी गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी दिली.
विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी सुरू असून, त्यामध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ३४७ मतदान केंद्रांच्या पाहणीअंती दीड हजारांहून अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे दोन भाग करण्यात येणार असून, त्यानुसार चार नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
संबंधित चार मतदान केंद्रे वाढीच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३५१ होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे यांनी सांगितले.