शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची हत्या पूर्ववैमानस्यातूनच! पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By नितिन गव्हाळे | Updated: October 31, 2022 14:14 IST2022-10-31T14:12:04+5:302022-10-31T14:14:57+5:30
अकोट फैल पोलिसांनी कारंजातून आवळल्या आरोपींच्या मुसक्या

शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची हत्या पूर्ववैमानस्यातूनच! पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
अकोला: शिवसेना(उद्धव ठाकरे) गटाचे अकोला उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले(२६) यांची जठारपेठ चौकात धारधार चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांसह रामदासपेठ पोलिसांनी रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली.
जिल्ह्यात गत आठवडाभरापासून प्राणघातक हल्ल्यासह, हत्येसारख्या घटना घडत आहेत. एकामागोमाग घडलेल्या तीन हत्यांनी शहर हादरले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास जठारपेठ चौकात शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर चार ते पाच हल्लेखारांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल कपले यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल कपले यास मृतक घोषित केले. या आरोपींनी विशालवर लगातार सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही हत्या करणाऱ्यांमध्ये दोघे आरोपी कारंजात असल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके यांच्यासह अकोट फैलचे पोलीस निरीक्षक नितीन सुशीर, पोलीस कर्मचारी दीप तराळे, छोटू पवार, प्रशांत इंगळे यांना मिळाली.
त्यांनी तातडीने कारंजा गाठून आरोपींना ताब्यात घेतले. या हत्ये प्रकरणी विविध कयास लावले जात असतानाच दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर(२३) व विनोद रमेश कांबळे(२२) दोघेही रा. महाकाली मंदिराजवळ मोठी उमरी यांनी विशालची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके तपास करीत आहेत.