बिबट्या आला रे आला...शेत शिवार झाले रिकामे! खिरपुरी खुर्द, व्याळा परिसरात शेतमजूर शेतात जाईना
By रवी दामोदर | Updated: September 18, 2023 19:57 IST2023-09-18T19:57:32+5:302023-09-18T19:57:55+5:30
मशागतीचे कामे थांबली, शेतकरी अडचणीत; खिरपूरी खुर्द परिसरातील खैराटी भागात एका वन्य प्राण्याची शिकार झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

बिबट्या आला रे आला...शेत शिवार झाले रिकामे! खिरपुरी खुर्द, व्याळा परिसरात शेतमजूर शेतात जाईना
अकोला : गत दहा दिवसांपूर्वी वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. हल्ला करून पसार झालेला बिबट त्याच परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. परंतू खिरपुरी खूर्द, खिरपूरी बु., व्याळा, बारलिंगा, हिंगणा परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. परिणामी शेतशिवार रिकामे झाले असून, शेतमजूरही शेतात जाण्यासाठी भीत आहे. सध्या परिसरातील मशागतीचे कामे ठप्प पडली असून, शेतकरी अडचणीत आले आहेत.
खिरपूरी खुर्द परिसरातील खैराटी भागात एका वन्य प्राण्याची शिकार झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे परिसरात भीती वाढली असून, शेतमजुर घरीच राहत आहेत. सध्या फवारणी, निंदणाची कामे सुरू असतात. परंतू परिसरात बिबट असल्याने शेतमजुरांमध्ये धास्ती आहे. फवारणी वेळेत होत नसल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. बिबट्याला तत्काळ पकडून भीती मुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खिरपुरी बु. व खिरपुरी खुर्द परिसरात बिबट्याची दशहत असून, शेतीचे कामे ठप्प झाली आहेत. शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ बिबट्याला पकडून जनतेला भीतीमुक्त करावे.
- रवी रमेश दांदळे, सरपंच, खिरपुरी बु.
वन विभागाचे पथकाने खिरपुरी, व्याळा, बारलिंगा परिसरात शोध मोहिम राबविली आहे. पिंजरे व ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी.
- सुरेश वडोदे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग अकोला.