विनातिकीट प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल
By Admin | Updated: March 28, 2016 01:26 IST2016-03-28T01:26:23+5:302016-03-28T01:26:23+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाची कारवाई; तिकीट तपासणी मोहीम होणार तीव्र.

विनातिकीट प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल
अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वाणिज्य विभागातर्फे सुरू असलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट प्रवास करणार्या २५ हजार ५00 प्रवाशांकडून १ कोटी ४२ लाख ६२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा दंडाची रक्कम दहा टक्के अधिक असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
रेल्वे बोर्डाच्यावतीने विभागात तपासणी पथक तैनात करण्यात आले होते तसेच मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडूनसुद्धा भुसावळ रेल्वे विभागाला संपूर्ण विभागात आकस्मिक तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार एप्रिल २0१५ ते मार्च २0१६ या आर्थिक वर्षात विभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत तब्बल २५ हजार ५00 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून रेल्वेने वर्षभरात १ कोटी ४२ लाख ६२ हजार रुपये दंड वसूल केला. विशेष बाब म्हणजे, फेब्रुवारी २0१६ मध्ये फुकट प्रवास करणार्या सर्वाधिक म्हणजे ५ हजार ९६0 प्रवाशांकडून ४४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवास करणार्या १८ हजार २३0 प्रवाशांकडून ९७ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर सामान (लगेज) बूक न करता प्रवास करणार्या ३१0 प्रवाशांकडून १ लाख ३३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत २0१५-१६ या आर्थिक वर्षात दहा टक्के अधिक रक्कम मिळाल्याची माहिती वाणिज्य अधिकार्यांनी ह्यलोकमतह्णला दिली.