राज्यातील अस्थायी प्राध्यापक डॉक्टर दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 11:20 IST2020-11-03T11:17:41+5:302020-11-03T11:20:17+5:30
Akola GMC News ४०० पेक्षा जास्त अस्थायी प्राध्यापक डॉक्टर सोमवारपासून दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले आहेत.

राज्यातील अस्थायी प्राध्यापक डॉक्टर दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर!
अकोला: अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांच्या सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४०० पेक्षा जास्त अस्थायी प्राध्यापक डॉक्टर सोमवारपासून दोन दिवसांच्या सामूहिक रजेवर गेले आहेत. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर पडणार आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अस्थायी सहायक प्राध्यापक म्हणून ४०० पेक्षा जास्त डॉक्टर कार्यरत आहेत. कोरोना काळात इतरांप्रमाणे जोखमीची कामे करूनही त्यांना वेतनवाढ झाली नाही. शिवाय, सेवा नियमित करण्यासंदर्भात केवळ आश्वासन देण्यात आले. त्यावर शासनाने अद्यापही ठोस निर्णय न घेतल्याने राज्यभरातील अस्थायी प्राध्यापक डॉक्टरांनी आंदोलनाचा पावित्रा घेत दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने देत काळ्या फिती लावून कामकाज केले होते; मात्र त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनात अकोला जीएमसीमधील २४ अस्थायी सहायक प्राध्यापकांचा सहभाग आहे. सोमवारी या डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने दिली. यावेळी डाॅ. श्रीनिवास चित्ता, डाॅ. माधुरी ढाकणे, डाॅ. पराग डोईफोडे, डाॅ. पंकज बदरखे, डाॅ. सागर फाटे, डाॅ. सुगत कावळे, डाॅ. अनूप गोसावी, डाॅ. शिल्पा कासट-चितलांगे, डाॅ. महेश पुरी, डाॅ. पूजा शाह, डाॅ. सालेहा खान, डाॅ. महेशचंद्र चापे, डाॅ. वीरेंद्र मोदी, डाॅ. दीपिका राठी- हेडा, डाॅ. अंकुश अजमेरा, डाॅ. रीषभ बिलाला, डाॅ. सनी वाधवाणी, डाॅ. महेश पुरी, डाॅ. सुष्मा देशमुख, डाॅ. अनुप गोसावी आदिंची उपस्थिती होती. आंदोलनाला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे.
वैद्यकीय सेवेवर परिणाम
अस्थायी प्राध्यापक, डॉक्टर आयसीयु, ओपीडी, लॅब तसेच कोविड वॉर्डातही सेवा देत आहेत; मात्र त्यांच्या सामूहिक रजेमुळे रुग्णसेवेवर परिणाम पडत आहे.