रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदारांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:58+5:302021-06-04T04:15:58+5:30
आलेगाव : पातुरचे तहसीलदार दीपक बाजड हे गुरुवारी गौण खनिज पथकासह आलेगाव परिसरात होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीची पाहणी ...

रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदारांची कारवाई
आलेगाव : पातुरचे तहसीलदार दीपक बाजड हे गुरुवारी गौण खनिज पथकासह आलेगाव परिसरात होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीची पाहणी करण्याकरिता गेले असता, आलेगाव-पिंपळडोली मार्गावर त्यांना एक ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना आढळून आला. ही रेती विनारॉयल्टी नेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तहसीलदारांनी ट्रॅक्टरचालकावर कारवाई करीत १ लाख १५ हजार रुपयांचा दंड ठाेठावून गुन्हा दाखल केला.
ट्रॅक्टर चालक गणेश राऊत याच्याविरुद्ध तहसीलदार बाजड यांनी गौण खनिज व महसूल अधिनियमाच्या कलमान्वये एक लाख रुपयांचा दंड तसेच गौण खनिजाच्या पाच पट दंड असा एकूण एक लाख १५ हजार ८३३ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन चान्नी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या आत दंड भरून ट्रॅक्टर मुक्त करून घेण्याचे आदेश तहसीलदार यांनी बजावले आहेत.
रेती माफियांकडून युवकाला मारहाण
पातूर तहसीलदारांनी आलेगाव ते पिंपळडोली मार्गावर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्यानंतर आलेगाव येथील दोन रेती माफियांनी मंगेश राऊत या युवकास जबर मारहाण केली. मंगेश राऊत याने तहसीलदारांना माहिती देऊन रेतीचा ट्रॅक्टर पकडून दिला, या संशयातून मारहाण झाल्याचे मंगेश राऊत याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संदीप महल्ले व नवनीत महल्ले यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.