शाळाबाह्यकामांबाबत शिक्षक संघटना एकत्र !
By Admin | Updated: November 13, 2015 02:17 IST2015-11-13T02:17:06+5:302015-11-13T02:17:06+5:30
बुलडाण्यात समन्वय समिती; नकाशेच्या आत्महत्येनंतर शासनाला सुचविल्या उपाययोजना.

शाळाबाह्यकामांबाबत शिक्षक संघटना एकत्र !
बुलडाणा : अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यभरातील शिक्षक संघटना एकत्र आल्या असून शाळाबाह्य व शिक्षणेत्तर कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात राज्यात प्रथमच बुलडाणा येथे १८ संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविली आहे. नकाशे यांच्या शाळेत शालेय पोषण आहाराचा ३0 किलो तांदूळ कमी आढळून आला होता, त्यामुळे पंचायत राज समितीने जाब विचारला. या प्रकाराची धास्ती घेत त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यातील १८ शिक्षक संघटना शाळाबाह्य व शिक्षणेत्तर कामांबाबत प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत. प्राथमिक शिक्षकांना ग्रामीण भागात अध्यापन करत असताना विद्याथ्यार्साठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागते. ही कामे करताना शिक्षकांचे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून गुणवत्ता कमी झाल्याचे खापर शिक्षकांवर फोडण्यात येते. शालेय पोषण आहार योजना राबवताना घडणार्या विषबाधा , पुरवठादाराकडून होणारा निकृष्ट माल, इंधन-भाजीपालाची अग्रिम रक्कम न मिळणे या सर्व घटनांना संपूर्णपणे शिक्षकांस जबाबदार धरण्यात येवून निलंबनापासून अटकेपर्यंत कारवाई केली जात असल्याने शिक्षकांमध्ये दशहतीचे वातावरण आहे. अशातच शाळा व्यवस्थापन समितीकडून होणारा मानसिक त्रास वेगळाच असल्याने शिक्षक वर्ग अस्वस्थ आहे.