सहा विद्यार्थिनींशी शिक्षकाचे लैंगिक चाळे
By Admin | Updated: April 3, 2016 15:43 IST2016-04-03T15:43:20+5:302016-04-03T15:43:20+5:30
समाजात मानाचे स्थान पटकाविणार्या शिक्षकाने शाळकरी विद्यार्थिनींना मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला.

सहा विद्यार्थिनींशी शिक्षकाचे लैंगिक चाळे
ऑनलाइन लोकमत
आमगाव, दि. ३ - विद्यादानाचे पवित्र कार्य करीत गुरू म्हणून समाजात मानाचे स्थान पटकाविणार्या शिक्षकाने शाळकरी विद्यार्थिनींना मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडवून शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्या शिक्षकाला शनिवारी अटक करण्यात आली.
आमगाव पंचायत समितीअंतर्गत तिगाव केंद्रामधील फुक्कीमेटा या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. तिथे इयत्ता तिसरीचा वर्गशिक्षक रमेश जयपाल पटले (५0) हा तिसरीत शिकणार्या सहा अल्पवयीन विद्यार्थिनींना मागील १५ दिवसांपासून आपल्या मोबाईलमधून अश्लील चित्रफित दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत होता. कधी समूहात तर कधी एकांतात तो विद्यार्थिनींना चित्रफित दाखवायचा. मात्र शिक्षकाच्या भीतीने घाबरलेल्या त्या विद्यार्थिनी हा प्रकार निमूटपणे सहन करीत होत्या. त्यामुळे शिक्षकाचे मनोबल वाढले. मात्र हा प्रकार वाढल्यानंतर मुलींनी त्याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. हा प्रकार कळताच पालकांमध्ये तीव्र संताप पसरला. दरम्यान, गावात इतरही लोकांमध्ये ही खबर पसरली. विद्यार्थिनींचे पालक व नागरिकांनी लागलीच शाळेकडे धाव घेतली.
घडलेल्या प्रकाराबद्दल पालकांनी शिक्षक रमेश पटले याला विचारणा केली असता त्याने शाळेतच आपले कृत्य कबुल केले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी कवळीटोला येथील रहिवासी असलेल्या त्या शिक्षकाला भादंवि कलम ३५४ अ, ८, १0 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.