शाळा समायोजनावर शिक्षकांचा आक्षेप
By Admin | Updated: May 3, 2015 02:13 IST2015-05-03T02:13:52+5:302015-05-03T02:13:52+5:30
शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा पवित्रा; समायोजनाने विद्यार्थ्यांचे होणार नुकसान

शाळा समायोजनावर शिक्षकांचा आक्षेप
अकोला : विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याऐवजी अस्तित्व टिकवण्याची धडपड करणार्या मनपा शाळांचे समायोजन करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवित प्रशासनाच्या निर्णयामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांंचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप संघटनांनी शनिवारी केला. मनपाच्या मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या ५५ शाळांमध्ये साडेसात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन २00६ मध्ये मन पात भाजपा-शिवसेना युतीच्या काळात ७४ पैकी १९ शाळांचे समायोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या तुलनेत आजपर्यंंत कोणतीही शैक्षणिक सुधारणा केली नाही. परिणामी आठ वर्षांंनंतर पुन्हा पटसंख्या कमी असल्याची लंगडी सबब पुढे करीत प्रशासनाने शाळा समायोजनाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ५५ शाळांपैकी १९ शाळेच्या समायोजनाचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला शिक्षक संघटनानी तीव्र विरोध दर्शवित आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.