शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ!
By Admin | Updated: July 27, 2016 01:53 IST2016-07-27T01:53:39+5:302016-07-27T01:53:39+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीपूर्वीच समायोजनाचा घाट घातला असल्याचे दिसुन येत आहे.

शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ!
संतोष येलकर / अकोला
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हय़ात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या २८९ शिक्षकांचे समायोजन ३0 जुलै रोजी जिल्हय़ातील सातही पंचायत समिती स्तरावर करण्यात येणार आहे; परंतु बिंदुनामावली मंजूर नसताना आणि पदोन्नतीची प्रक्रिया रखडली असल्याच्या स्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा घाट रचण्यात आल्याने, अतिरिक्त शिक्षकांच्या या समायोजनातही घोळ होणार आहे.
ऑगस्ट २0११ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकपदाची पदोन्नती दिल्यानंतर, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे; परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची गत सात वर्षांपासून बिंदुनामावली (रोस्टर) मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. बिंदुनामावलीच्या मंजुरीअभावी जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली आहे. त्यासोबतच गतवर्षीपासून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही रेंगाळले आहे. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात जिल्हा परिषद शाळांवर २८९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर जिल्हय़ात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग आणि ग्राम विकास विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे सातही पंचायत समिती स्तरावर ३0 जुलै रोजी समायोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने पंचायत समिती स्तरावर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, जिल्हय़ातील पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया मात्र अद्याप रखडली आहे. पदोन्नतीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा घाट रचण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत घोळ होण्याची चिन्हे दिसत आहेत.