८७५ पायदळ वार्या करणारे टेलरमामा!
By Admin | Updated: February 11, 2015 01:18 IST2015-02-11T01:18:20+5:302015-02-11T01:18:20+5:30
वारी शेगावाची करी जो भक्त, तयासी अनंत सांभाळीत..गजानन भक्तीचे असेही वेड.

८७५ पायदळ वार्या करणारे टेलरमामा!
नितीन गव्हाळे / अकोला:
देव आणि भक्ताचे एक नाते आहे. परंतु या नात्यात स्वार्थच अधिक आहे. निस्वार्थ भक्ती आता क्वचितच दिसून येते. शेगावीचे संत गजानन महाराज म्हणजे वैदर्भीय भाविकांचे श्रद्धास्थान. गजाननावर असलेल्या श्रद्धेपोटीच हजारो लोक पायदळ वार्या करतात. या पायदळ वार्यांमागेही काही ना काही भावना दडलेली असते. प्रत्येकजण काहीतरी मागणे घेऊनच संत गजाननाच्या दरबारात जातो. परंतु गजाननाचा एक भक्त कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ, निर्मळ भावनेतून अविरत पायी वारी करतो आहे. आतापर्यंत या भक्ताने शेगावीच्या ८७५ पायदळ वार्या केल्या आहे. या भक्ताचे नाव आहे, टेलरमामा ऊर्फ मधुकर त्र्यंबकराव राजूरकर.
लोक त्यांना आदराने टेलरमामा म्हणतात. टेलरमामा मूळचे शेलुबाजारचे राहणारे. त्यांचे वडील शेतकरी होते. सातव्या वर्गापर्यंंत शिक्षण झालेल्या टेलरमामांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. गावात ते टेलरकाम शिकले. परंतु तेथे राहून पोट भरणार नव्हते. म्हणून १९७0 च्या सुमारास ते अकोल्यात आले. देशमुख फैलात त्यांनी आपले बस्तान मांडले. टेलर काम करून संसार उभा केला. हळूहळू स्वतचे घरही उभे केले. अशातच त्यांना शेगावीच्या राणाची ओढ लागली. शेगावीला जाणे-येणे वाढले. श्रींच्या भक्तीने त्यांच्यामध्ये आंतरिक ऊर्जा निर्माण केली. गेल्या १४ वर्षांंपासून टेलरमामा शेगावीच्या पायी वार्या करताहेत. त्यांच्या वारीत खंड पडलेला नाही. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बागळता हा गजानन भक्त पायी वार्या करतो आहे. दर गुरुवारी केवळ चहा घेऊन टेलरमामा शेगावीसाठी निघतात. आतापर्यंंत त्यांनी ८७५ शेगावीच्या पायदळ वार्या केल्यात.