वादळी वाऱ्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ!
By Admin | Updated: May 26, 2017 02:52 IST2017-05-26T02:52:45+5:302017-05-26T02:52:45+5:30
खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी धावपळ

वादळी वाऱ्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील ‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी गुरुवारी रात्री तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला; मात्र तुरीचे मोजमाप संथ गतीने सुरू असल्याने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर २५ मेपर्यंत ४९६ ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप होणे बाकी आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील उर्वरित चार खरेदी केंद्रांवर आहे. गुरुवारी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास वादळी वारे आणि अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. वादळी वारे सुरू झाल्याने आणि अवकाळी पावसात तूर भिजण्याच्या भीतीने तुरीचे नुकसान होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
अवकाळी पावसाची शक्यता; तूर भिजण्याचे शेतकऱ्यांपुढे संकट!
गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाच्या नागपूर येथील वेध शाळेमार्फत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. या पृष्ठभूमीवर वादळी वारे आणि अवकाळी पावसात जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेली तूर भिजण्याची शक्यता असल्याचे संकट तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.
वादळी वारे आणि अवकाळी पावसात भिजल्याने तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना ताडपत्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- शिरीष धोत्रे,
सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.