तन्वी-तनीष हत्याकांडातील आरोपी मातेची सुटका
By Admin | Updated: March 28, 2015 01:52 IST2015-03-28T01:52:14+5:302015-03-28T01:52:14+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी केली सुटका; चिमुकल्यांच्या हत्येनंतर आत्महत्येचा केला होता प्रयत्न.

तन्वी-तनीष हत्याकांडातील आरोपी मातेची सुटका
अकोला - शहरातील बहुचर्चित तन्वी-तनीश जैन या दोन चिमुकल्यांच्या हत्याकांडातील आरोपी स्वाती अशोक जैन हिची जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सबळ पुराव्याअभावी सुटका केली. स्वाती जैन यांच्या पतीच्या तक्रारीनंतरच त्यांच्यावर सिव्हिल लाइन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. शास्त्रीनगरातील आभा रेसिडन्सीमधील एका फ्लॅटमध्ये रहिवासी असलेल्या स्वाती अशोक जैन यांनी १५ जानेवारी २0१४ रोजी ६ वर्षीय तन्वी आणि ३ वर्षीय तनीष या दोन चिमुकल्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दोन चिमुकल्यांच्या हत्येनंतर स्वाती जैन यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता; मात्र सुदैवाने स्वाती जैन यांचे प्राण वाचले होते. या प्रकरणी स्वाती जैन यांचे पती अशोक जैन यांनी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून स्वाती जैन यांच्याविरुद्ध तन्वी आणि तनीष या दोघांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गंभीर असलेल्या स्वाती जैन यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून सुटी होताच सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली होती. अटकेपासून स्वाती जैन कारागृहातच होत्या. या प्रकरणाची सुनावणी झाली असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने स्वाती जैन यांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.