तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:55+5:302021-07-10T04:13:55+5:30
बाळापूर : तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विदर्भ पटवारी संघाने उपविभागीय ...

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार
बाळापूर : तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी विदर्भ पटवारी संघाने उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांना निवेदन दिले. तसेच तहसीलदारांकडे डिजिटल सिग्नेचर (डीएससी) टोकन जमा करून ऑनलाइन कामकाजावर दि. ८ जुलैपासून बहिष्कार टाकला.
विदर्भ पटवारी संघाने उपविभागीय अधिकारी डॉ. पुरी यांना दिलेल्या निवेदनानुसार, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सन २०१४ मध्ये पुरवण्यात आलेल्या लॅपटाॅप व प्रिंटर्स कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे ती नव्याने उपलब्ध करून द्यावी, रिक्त असलेल्या मंडळ अधिकारीपदी पदोन्नतीने तलाठ्यांना नियुक्त करावे, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. निवेदन देताना विदर्भ पटवारी संघाचे प्रदेश पदाधिकारी गजानन भागवत यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.
-------------------------
मागण्या पूर्ण होईपर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा विदर्भ पटवारी संघाने निवेदनातून दिला आहे.
तहसीलदार डी.एल. मुंकुदे यांच्याकडे २५ तलाठी व १ मंडळ अधिकाऱ्यांनी डिजिटल सिग्नेचर (डी.एस.सी.) टोकन जमा केले असून, बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.