लाच घेताना तलाठी अटकेत
By Admin | Updated: July 10, 2015 00:11 IST2015-07-10T00:11:50+5:302015-07-10T00:11:50+5:30
फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठय़ास रंगेहात पकडले.

लाच घेताना तलाठी अटकेत
खामगाव : फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना ९ जुलै रोजी येथील एका हॉटेलमध्ये घडली. तालुक्यातील भालेगाव बाजार येथील रहिवासी श्रीकांत भानुदास खाळपे (१९) यांना शेताची नोंद फेरफारमध्ये करावयाची होती. त्यासाठी श्रीकांत खाळपे यांनी तलाठी संजय महादेव इंगळे (रा. पळशी) याच्याकडे कागदपत्रे दिली होती; मात्र तलाठी इंगळे याने नोंद घेण्यास टाळाटाळ केली व त्यानंतर श्रीकांत खाळपे यांना अडीच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार श्रीकांत खाळपे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. खामगाव शहरातील अग्रसेन चौकातील गोखले आनंदभवन या हॉटेलमध्ये ९ जुलै रोजी संध्याकाळी पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार तलाठी संजय इंगळे याने श्रीकांत खाळपे यांच्याकडून दोन हजारांची लाच घेताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण खंडार व सोपान भाईक, नायक कॉन्स्टेबल विजय वारुळे, कॉन्स्टेबल संतोष यादव, महेंद्र चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी तलाठी संजय इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.