गाळ काढून तळ्यांच्या स्वच्छतेवर भर
By Admin | Updated: February 24, 2015 00:22 IST2015-02-24T00:22:11+5:302015-02-24T00:22:11+5:30
जलयुक्त शिवार अभियान; मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी.

गाळ काढून तळ्यांच्या स्वच्छतेवर भर
अकोला : पाणटंचाईच्या स्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. राज्यात वारंवार उद्भवणार्या पाणीटंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ढाळीचे बांध, शेततळे, माती नालाबांध, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट बंधारा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, साठवण बंधार्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, सिंचन तलाव, विहीर आणि बोअरचे पुनर्भरण तसेच इतर प्रकारच्या कामांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियानातील या जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याची कामे केली जाणार आहेत. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्री २५ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्तांची बैठक घेणार असल्याचे अमरावती येथील विभागीय उपायुक्त (रोहयो) एस. टी. टाकसाळे यांनी स्पष्ट केले. *मुख्यमंत्र्यांची बैठक बुधवारी! जलयुक्त शिवार अभियानात तळ्यांमधील गाळ काढून ती स्वच्छ व खोल करण्यावर भर दिला जाणार आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकार्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.