विघातक कृत्यास प्रवृत्त करण्यासाठी टी-शर्टवर छापला आक्षेपार्ह मजकूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:29 IST2016-08-24T00:29:40+5:302016-08-24T00:29:40+5:30
पोलिसांची दमछाक : कावड यात्रेसाठी बनविलेले १00 टी-शर्ट जप्त.

विघातक कृत्यास प्रवृत्त करण्यासाठी टी-शर्टवर छापला आक्षेपार्ह मजकूर!
अकोला, दि. २३: श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी गांधीग्रात ते अकोला पालखी कावड यात्रेत घालण्यासाठी एका कावड मंडळाने चक्क विघातक कृत्यास युवकांना प्रवृत्त करण्यासाठी असलेले शब्द वापरून आक्षेपार्ह टी-शर्ट छापल्याचा प्रकार समोर येताच सिटी कोतवाली पोलिसांनी टी-शर्ट जप्तीसाठी मंगळवारी दिवसभर चांगलीच धावपळ केली. या टी-शर्ट जप्त केल्यानंतर सदर मंडळाचे पदाधिकारी व टी-शर्ट बनविणार्याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
जुना आळशी प्लॉटमधील चिवचिव बाजार परिसरातील रहिवासी मिथुन ऊर्फ मोंटी ऊर्फ मंगेश सुधाकर इंगळे (३२) याने कावड यात्रेसाठी शंभर टी-शर्ट बनविण्यासाठी एका कापड दुकानदारास सांगितले. या टी-शर्टवर आक्षेपार्ह मजकूरही छापण्यास सांगितले. त्यानंतर आक्षेपार्ह मजकूर असलेल्या १00 टी-शर्ट छापण्यात आल्यात. या टी-शर्टवर युवकांना विघातक कृत्यासाठी प्रवृत्त करणारा मजकूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत मंगेश इंगळे व टी-शर्ट छापणारा वानखडेनगर येथील रहिवासी राजेश मोहनलाल सिसोदिया (३१) या दोघांविरुद्ध मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर सदर १00 टी शर्ट जप्तीसाठी सिटी कोतवाली पोलिसांनी चांगलीच धावपळ केली. उशिरा रात्रीपर्यंंंत पोलिसांनी हे टी-शर्ट जप्तही केले.
पोलिसांचा 'वॉच'
धार्मिक सण, उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी म्हणून पोलिसांची सर्वांंंवरच करडी नजर राहणार आहे. कावड यात्रेत सहभागी होणार्या शिवभक्तांनी आजूबाजूला होणार्या हालचालींवर स्वत:च लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांद्वारे करण्यात आले आहे.