राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:28 IST2019-09-29T13:28:15+5:302019-09-29T13:28:22+5:30

आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Swine flu threatens again in state | राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

अकोला : राज्यात ‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले असून, गत महिनाभरात राज्यात स्वाइन फ्लूचे १५ बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि नागपूरमधील सर्वाधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका बसत असून, नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून, विविध आजारांनी डोके वर काढले आहे. इतर संसर्गजन्य आजारांसोबतच स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गत महिनाभरात राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यासह राज्यातील इतर भागात ‘स्वाइन फ्लू’सदृश रुग्णांची संख्याही वाढली आहे; परंतु यातील बहुतांश रुग्णांना उपचारातून दिलासा मिळाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नऊ महिन्यांत २१२ जणांचा बळी
राज्यात गत नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूच्या २,२०७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ९० पेक्षा जास्त रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गतवर्षी शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ५१ हजार ९८९ व्यक्तींना स्वाइन फ्लूचे लसीकरण करण्यात आले आहे.

ही आहेत लक्षणे
सर्दी, ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, छातीत दुखणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे आढळून येतात.

अकोल्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून सर्दी, ताप, घसादुखी यांसारखे आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

Web Title: Swine flu threatens again in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.