स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण शासकीय मदतीपासून वंचित!
By Admin | Updated: April 24, 2015 02:11 IST2015-04-24T02:11:16+5:302015-04-24T02:11:16+5:30
अकोला जिल्ह्यात समितीची एकही बैठक नाही.

स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण शासकीय मदतीपासून वंचित!
अकोला : स्वाइन फ्लूच्या रूग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण आणि उपचारावर होणार्या अत्याधिक खर्चामुळे राज्य शासनाने रुग्णांच्या उपचाराचा खर्च देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले; परंतु समितीची अद्याप एकही बैठक न झाल्याने उपचार घेणार्या रुग्णांची माहितीच तयार होऊ शकली नाही. त्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आर्थिक मदतीपासून वंचित असून, याबाबत आरोग्य विभागही चुप्पी साधून आहे. राज्यात दोन महिन्यांपूर्वी स्वाइन फ्लूने हैदोस घातला. हजारो रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढल्याने राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये २ मार्चनंतर व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. रुग्णांच्या उपचाराचा खर्च देण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून तीन कोटी रुपये आरोग्य सेवा संचालक (मुंबई) यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात पात्र रुग्णांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली; परंतु अकोल्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीची एकही बैठक अद्याप झाली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले स्वाइन फ्लूचे रुग्ण आर्थिक मदतीपासून वंचित आहे. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांची माहिती मागविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगीतले. संपूर्ण माहिती गोळा झाल्यावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पात्र रुग्णांची आर्थिक मदतीसाठी निवड होणार असल्याची माहिती दिली.
*सीजीएचएसच्या नियमानुसार मिळणार मदत
२0 मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार करणार्या गरीब रुग्णांना सीजीएचएस (केंद्र सरकार आरोग्य योजना) अंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार होती; परंतु स्थानिक स्तरावर याबाबत उदासीनता दिसून येत आहे.