स्वाइन फ्लूचे संकट कायम; चौथा रुग्ण आढळला!
By Admin | Updated: July 26, 2016 02:05 IST2016-07-26T02:05:19+5:302016-07-26T02:05:19+5:30
सिंधी कॅम्पमधील वृद्धेला स्वाइन फ्लूची बाधा; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अवाहन.
_ns.jpg)
स्वाइन फ्लूचे संकट कायम; चौथा रुग्ण आढळला!
अकोला: गत काही दिवसांपासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत चार रुग्ण मिळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकापाठोपाठ स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण मिळून येत असल्याने अकोल्यात स्वाइन फ्लूचे संकट बळावले आहे. आतापर्यंत जीवघेण्या स्वाइन फ्लूने दोन बळी घेतले आहेत. सोमवारी सिंधी कॅम्प परिसरातील वृद्धेला स्वाइन फ्लू आजाराची बाधा झाल्याचे समोर आले. सिंधी कॅम्पमधील एक ७६ वर्षीय महिला आजारी असल्याने तिला २0 जुलै रोजी शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या महिलेच्या रक्तामध्ये स्वाइन फ्लूचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या आठवड्यामध्ये बाश्रीटाकळी येथील ५२ वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. सोबतच त्याच्या मुलाला स्वाइन फ्लूची लागण असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. स्वाइन फ्लूच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. सिंधी कॅम्पमध्ये स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने महापालिका आरोग्य विभागाचे मंगळवारी सिंधी कॅम्प परिसरातील नागरिकांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे. शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्येसुद्धा धास्ती पसरली आहे.