वर्‍हाडातील रसाचा गोडवा गुजरातेत भावतोय!

By Admin | Updated: May 12, 2014 18:30 IST2014-05-11T23:51:30+5:302014-05-12T18:30:10+5:30

रसवंतीतून उन्हाळ्यात होते एक ते दोन लाखांपर्यंतचा नफा

The sweet wine of Varhad in Gujarat! | वर्‍हाडातील रसाचा गोडवा गुजरातेत भावतोय!

वर्‍हाडातील रसाचा गोडवा गुजरातेत भावतोय!

अकोला : वर्‍हाडातील अनेक शेतकरी व नागरिक गुजरातमध्ये उन्हाळ्यात रसवंती सुरू करीत असून, वर्‍हाडातील रसवंतीचा रस गुजरातमधील नागरिकांना चांगलाच भावत आहे. या कुटुंबांना दरवर्षी उन्हाळ्यातील तीन ते चार महिन्यात एक ते दोन लाख रुपयांचा नफा होत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे.
उन्हाळ्यात शेताची तसेच अन्य कामे नसल्यामुळे वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाण्यातील हजारो कुटुंबे गुजरात, मुंबई, पुणे येथे स्थलांतर करतात. उन्हाळा संपल्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर ही कुटुंब परतात. गत काही वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील शिर्ला, पातूर, भंडारजसह अन्य गावांतील नागरिक गुजरातमध्ये जाऊन रसवंतीचा व्यवसाय करीत आहेत. यातून त्यांना लाखो रुपये नफा मिळत असल्यामुळे दरवर्षी गुजरातमध्ये जाऊन रसवंती सुरू करण्याकरिता जाणार्‍या कुटुंबांची संख्या वाढतच आहे. ही कुटुंब छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाऊन रसवंती लावून रसाची विक्री करीत आहेत. वर्‍हाडातून दरवर्षी पती व पत्नी गुजरातमध्ये जातात. लाकडाच्या घाण्याद्वारे रस काढण्याची रसवंती टाकतात. पत्नी घाण्यात ऊस टाकून रस काढते तर पती घाणा ओढतो. गुजरातमधील नागरिक यंत्राने काढलेला रस पीत नाहीत. कारण त्यामध्ये ऑईल पडत असल्याची त्यांची समजूत आहे. तसेच बैलाच्या घाणीद्वारे काढलेला रस ते पीत नाहीत. त्यामुळे त्यांना माणसांनी घाणीचा दांडा ओढून काढलेला रस भावतो. चार ते पाच वर्षांपूर्वी शिर्ला येथील काही नागरिकांनी गुजरातमध्ये रसवंती सुरू केली होती. त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांनी गावातील अन्य नागरिकांना रसवंती सुरू करण्याबाबत सांगितले. त्यांनाही चांगले उत्पादन मिळाल्यामुळे ही माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाली. यावर्षी जवळपास दोन ते अडीच हजार कुटुंबे गुजरातमध्ये रसवंती सुरू करण्यासाठी गेली आहेत. ही कुटुंबे दरवर्षी उन्हाळ्यात एक ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात. त्यानंतर शेतीची कामे सुरू झाल्यावर परत येतात. दरवर्षी गुजरातमध्ये जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढच होत आहे. सध्या पातूर तालुक्यातील गावांमधील कुटुंब गुजरातमध्ये गेली आहेत.

Web Title: The sweet wine of Varhad in Gujarat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.