शोकाकुल वातावरणात सुयशवर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: January 17, 2015 01:28 IST2015-01-17T01:28:02+5:302015-01-17T01:28:02+5:30

सुयशची प्रथमदर्शनी सुयशची आत्महत्याच; मोहननगर पोलीस करणार तपास.

Suyashwar funeral in a sad atmosphere | शोकाकुल वातावरणात सुयशवर अंत्यसंस्कार

शोकाकुल वातावरणात सुयशवर अंत्यसंस्कार

अकोला : सुप्रसिद्ध उद्योजक जयंत पडगिलवार यांचा मुलगा सुयश याने छत्तीसगड राज्यातील दुर्ग शहरातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास सुयशचे पार्थिव तापडियानगरातील निवासस्थानी आणण्यात आले. रात्री ८ च्या सुमारास मोहता मिल मोक्षधामावर त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुयश पडगिलवार हा १३ जानेवारीला दुपारपासून बेपत्ता झाला होता. एमआयडीसीतील इंडस्ट्रीमधून तो कोणाला न सांगता निघून गेला. एमएच ३0 पी ३३३८ क्रमांकाच्या कारने त्याने छत्तीसगड राज्यातील दुर्ग शहर गाठून गुरुवारी दुपारी तेथील हॉटेल कुणालमधील रूम क्रमांक १0५ मध्ये चादरने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तेथील मोहननगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सुयशच्या आत्महत्येची वार्ता पसरताच त्याच्या निवासस्थानी शहरातील उद्योजक, व्यापारी, नातेवाईक व मित्रमंडळींनी धाव घेतली होती.
त्याचे पार्थिव शुक्रवारी आणल्यानंतर शेकडो गणमान्य नागरिकांनी तापडियानगरातील पडगिलवार यांच्या निवासस्थानी गर्दी केली. नागरिकांनी जयंत पडगिलवार यांच्या दु:खामध्ये सहभागी होत त्यांचे सांत्वन केले. शुक्रवारी रात्री मोहता मिल मोक्षधामावर सुयशच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील जयंत पडगिलवार यांनी अत्यंत जड अंत:करणाने लाडक्या मुलाच्या पार्थिवास चिताग्नी दिला. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांसह उद्योजक, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील नेते उपस्थित होते.

*प्रथमदर्शनी सुयशची आत्महत्याच
दुर्ग शहरातील मोहननगर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी पी. एल. साहू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हॉटेलच्या रूमच्या तपासणीनंतर सुयशने प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याची बाब स्पष्ट केली. त्याच्या रूमची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू मिळून आली नाही. सुयशच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मृत्यूबाबत माहिती समोर येऊ शकते. मोहननगर पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याची कार जप्त केल्याची माहिती साहू यांनी दिली.

*आत्महत्येचा तपास मोहननगर पोलीस करणार
सुयश पडगिलवार बेपत्ता झाल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. रामदासपेठ पोलिसांनी सुयशचा शोध घेतला. त्याने दुर्ग शहरात आत्महत्या केली. त्यामुळे त्याच्या आत्महत्येसंबधीचा तपास मोहननगर पोलीस करणार आहेत. रामदासपेठ पोलीस ठाण्यात वडिलांनी तक्रार दिल्याने त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे तसेच हे प्रकरण मोहननगर पोलिसांनी रामदासपेठ पोलिसांकडे वर्ग केल्यास आम्ही आत्महत्या प्रकरणाचा तपास करू, अशी माहिती ठाणेदार सुधाकर देशमुख यांनी दिली.

Web Title: Suyashwar funeral in a sad atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.