विस्तार अधिकारी भरतीप्रकरणी दोन निलंबित
By Admin | Updated: February 6, 2015 02:07 IST2015-02-06T02:07:50+5:302015-02-06T02:07:50+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेने नियमबाह्य पद्धतीने राबविली होती भरती प्रक्रिया.

विस्तार अधिकारी भरतीप्रकरणी दोन निलंबित
बुलडाणा: जिल्हा परिषदेने २0१0 मध्ये घेतलेल्या शिक्षण विस्तार अधिकारीपदाची प्रक्रिया प्रलंबित असताना पुन्हा ३ नोव्हेंबर २0१४ रोजी याच पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. जि.प. चा हा भोंगळ कारभार ह्यलोकमतह्ण ने चव्हाट्यावर आणल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी चौकशीअंती दोन कर्मचार्यांना निलंबित करण्याची कारवाई ४ फेब्रुवारी रोजी केली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक एन.पी.किन्होळकर व कनिष्ठ सहायक के. आर. उबरहंडे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या भरतीसंदर्भात शासनाने सन २0१0 मध्ये लेखी परीक्षा पार पडल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे अनिवार्य असताना त्यांनी २३ मे २0१२ ते १५ मे २0१३ पर्यंत सदर यादी त्यांच्या स्तरावरच प्रलंबित ठेवली व वस्तुस्थिती जिल्हा निवड समितीसमोर सादर केली नाही, त्यामुळे किन्होळकर यांच्यावर कारवाई केली आहे तर सन २0१४ चे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी शासनाने १0 जून २0१४ रोजी दिलेल्या नव्या निर्देशांकडे डोळेझाक करीत नेमणुकीचे प्रमाण चुकीचे दर्शवून पदे रिक्त नसतानाही रिक्त पदे दाखविली व वरिष्ठांची दिशाभूल केली, यानुसार पदभरतीची जाहिरात काढून ही भरती प्रक्रिया पार पाडली व निकालही जाहीर झाला. त्यानंतर ही भरती प्रक्रियाच नियमबाह्य ठरल्याची बाब समोर आल्याने उबरहंडे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.