विरोधी पक्षनेत्यासह तीन नगरसेवक निलंबित
By Admin | Updated: May 30, 2017 02:19 IST2017-05-30T02:19:28+5:302017-05-30T02:19:28+5:30
मनपा सभागृहात तोडफोड : करवाढीविरुद्ध काँग्रेस, सेना आक्रमक

विरोधी पक्षनेत्यासह तीन नगरसेवक निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मालमत्ता करात केलेल्या दरवाढीचा विरोध दर्शविण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिका आमसभेत गोंधळ घालून सभागृहातील साहित्याची तोडफोड केली. या प्रकारामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्हाण या तिघांना निलंबित केल्याची घोषणा केली. या नगरसेवकांना सिटी कोतवाली पोलिसांनी सभागृहातून उचलून त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली.
सोमवार २९ मे रोजी दुपारी तीन वाजता महापालिकेची आमसभा बोलाविण्यात आली होती. या आमसभेच्या निमित्ताने कर दरवाढीला विरोध दर्शविण्यासाठी महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली. तीन वाजता आमसभा सुरू होण्यापूर्वीच, करवाढीची दादागिरी चालणार नाही, करवाढ मागे घ्या, अशी नारेबाजी करीत काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांचा मोर्चा महापालिकेच्या सभागृहात शिरला. जय भवानी, जय शिवाजीचा गजर करीत नगरसेवक आक्रमक झालेत.यावेळी महापौर अग्रवाल यांनी विधायक मार्गाने आमसभेच्या शेवटी चर्चा केल्या जाईल, असे आवाहन केले; मात्र त्यांचे काहीएक न ऐकता, आंदोलक हमरीतुमरीवर आले. करवाढची दादागिरी नही चलेंगी, म्हणत, सभागृहातील खुर्च्यांची आदळ-आपट करण्यात आली. हातात करवाढीचा विरोध करणारे फलक घेऊन, फ्लेक्सचे कपडे परिधान करून आलेले नगरसेवक आधी करवाढीसंदर्भात चर्चा करा, या मागणीवर अडून बसले.आंदोलकांची मागणी महापौरांनी फेटाळून लावल्याने आक्रमक पदाधिकाऱ्यांनी महापालिका सभागृहात तोडफोड सुरू केली. टेबलच्या काचा फोडून, सभागृहातील माईक तोडला तसेच प्लॉस्टिकच्या खुर्च्या तोडल्या.
या सर्व गोंधळामुळे सभागृहाला काही वेळेसाठी आखाड्याचे स्वरूप आले होते. महिला नगरसेविकांनी महापौर विजय अग्रवाल,आयुक्त अजय लहाने, उपायुक्त वैशाली शेळके यांच्या कक्षाकडे धाव घेतली. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनादेखील आंदोलकांना आवरणे कठीण झाल्याने सभागृहातील गोंधळ वाढत गेला. परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने महापौरांनी आक्रमक झालेल्या तीनही नगरसेवकांना निलंबीत करण्याची घोषणा केली. आमसभेच्या निमित्ताने आंदोलन होणार असल्याची कुणकुण सत्ताधाऱ्यांना लागली होती. त्यामुळे आधीच महापालिकेत सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे आणि पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले होते हे विशेष.
गल्लीपासून-दिल्लीपर्यंत सत्ता मिळालेली असतानाही भाजपा पदाधिकाऱ्यांना निधी मिळविता येत नाही. सर्वसामान्य लोकांचे खिसे कापून विकास करण्याची भाषा स्थानिक पदाधिकारी करीत असून, अकोलेकरांवर कर लादून अन्याय केला जात आहे. त्यांची दादागिरीची आहे.
- साजिद खान, विरोधी पक्ष नेता
अतिरिक्त करवाढीला आमचा विरोध आहे, भाजपाच्या विरोधात आम्ही नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने लोकशाही आणि न्यायिक मार्गानेच आंदोलन केले; मात्र सत्ताधाऱ्यांची भाषा चुकली. त्यांनी केलेले निलंबनही चुकीचे आहे.
- राजेश मिश्रा, नगरसेवक, शिवसेना