महावितरणच्या अभियंत्यासह तिघे निलंबित
By Admin | Updated: July 13, 2014 21:33 IST2014-07-13T20:13:58+5:302014-07-13T21:33:19+5:30
कार्यालयात येऊन कागदपत्रांमध्ये खोडतोड करून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

महावितरणच्या अभियंत्यासह तिघे निलंबित
अकोला: महावितरण कंपनीच्या अकोला ग्रामीण विभागांतर्गत येणार्या बाश्रीटाकळी उपविभागाचे सहाय्यक अभियंता एम.ए. खांडरे यांच्यासह दोघाजणांविरोधातील तक्रारींची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांची बदली केली होती. मात्र, त्यांनी रविवारी कार्यालयात येऊन कागदपत्रांमध्ये खोडतोड करून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सहाय्यक अभियंता खांडरे यांच्यासह दुय्यम अभियंता व कनिष्ठ लिपिक यांना निलंबित केल्याची माहिती आहे. त्यांच्या विरोधात बाश्रीटाकळी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
बाश्रीटाकळी येथे नॉन डीडीएफ योजनेंतर्गत शेकडो कृषीपंप अनधिकृत असल्याचे आढळले होते. अनेक विद्युत खांबाची अनधिकृत उभारणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी केली. त्यानंतर अभियंता खांडरे, दुय्यम अभियंता नसीम खान व कनिष्ठ लिपिक विजय मानकर यांची बदली करण्यात आली होती. तसेच त्यांना कार्यमुक्तही करण्यात आले होते. त्यांची बदली झाल्यानंतरही त्यांनी रविवारी कार्यालयात येऊन कागदपत्रांमधील घोळ मिटवून आपल्या विरोधातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आली. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी अंती त्यांना मंगळवारी रात्री उशिरा निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
** मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता
नॉन डीडीएफ कृषीपंप योजनेत बराच मोठा अपहार झाला असल्याची शक्यता आहे. केवळ एकटा अधिकारी हा अपहार करण्याची शक्यता नसून, यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. महावितरणकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तसेच दोषींवर कारवाईही करण्यात येणार आहे.