सोयाबीन वाचविण्यासाठी धावपळ!
By Admin | Updated: October 27, 2014 01:33 IST2014-10-27T01:33:03+5:302014-10-27T01:33:03+5:30
दुस-या दिवशीही अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

सोयाबीन वाचविण्यासाठी धावपळ!
अकोला: जिल्ह्यात दुसर्या दिवशीही (रविवारी) ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाने हजेरी लावल्याच्या स्थितीत कापणीला आलेल्या आणि कापणीनंतर शेतात गंजी लावलेल्या सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे.
शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी आणि खरीप हंगामातील कपाशी पिकासाठी हा अवकाळी रिमझिम पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते. दुसर्या दिवशी म्हणजेच रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, अधून-मधून अवकाळी रिमझिम पाऊसही सुरू होता. पावसाच्या या वातावरणात शेतात कापणीला आलेले सोयाबीन आणि कापणी झालेल्या शेतातील सोयाबीनचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने का पणीनंतर शेतातच लावण्यात आलेल्या सोयाबीनच्या गंज्या पावसामुळे भिजू नयेत, यासाठी सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांची सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसत आहे. आधीच यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अल्प पावसामुळे मूग, उडिदाचे पीक हातून गेले असताना, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली आहे. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याने शे तकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता ढगाळ व पावसाच्या वातावरणात हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यानुषंगाने पावसाच्या वातावरणात सोयाबीन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.