अकोला जिल्ह्यात ‘ड्रोन’द्वारे गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 10:49 IST2021-01-13T10:48:46+5:302021-01-13T10:49:46+5:30
Akola News मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मंगळवारी या सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

अकोला जिल्ह्यात ‘ड्रोन’द्वारे गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण!
अकोला : केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे जिल्ह्यात गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यात ८१० गावांच्या गावठाणांतील मालमत्तापत्रक (प्राॅपर्टी कार्ड) आणि नकाशे तयार करण्याचे काम चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मंगळवारी या सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.
केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत राज्यातील काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोन मोजणी प्रकल्पाद्वारे गावठाणातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून मालमत्तापत्रक आणि प्रत्येक मालमत्तेचा नकाशा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात गावठाणांतील मालमत्तांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करण्याचा प्रारंभ १२ जानेवारी रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विलास शिरोळकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, उपअधीक्षक नितीन अटाळे, सर्व्हे ऑफ इंडियाचे सर्व्हेअर अधिकारी अनिलकुमार, गटविकास अधिकारी पायस उपस्थित होते. ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षणात गावठाणातील मालमत्तापत्रक आणि नकाशा तयार करण्याचे प्रात्यक्षिक या वेळी करण्यात आले. जिल्ह्यातील ८१० गावांत गावठाणांचे ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करून मालमत्तापत्रक व नकाशे तयार करण्याचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.
केवळ दहा मिनिटांत सर्वेक्षण पूर्ण!
खापरवाडा येथे ‘ड्रोन’द्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण केवळ दहा मिनिटांत पूर्ण करण्यात आले. तसेच गावठाणातील मालमत्तांचे नकाशे तयार करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
रस्ते, अतिक्रमण, मालमत्तांची होणार निश्चिती!
‘ड्रोन’द्वारे जिल्ह्यातील ८१० गावांत गावठाणांत मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील रस्ते, नाले, शेतरस्ते, पाणंद रस्ते, अतिक्रमण व मालमत्तांची निश्चिती होणार आहे. गावठाणांतील मालमत्तांचे अभिलेखे अद्ययावत होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.