स्वायत्त संस्थांना पूर्वसूचना न देता होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 10:53 IST2020-01-28T10:53:34+5:302020-01-28T10:53:42+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी केली जात आहे.

स्वायत्त संस्थांना पूर्वसूचना न देता होणार सर्वेक्षण
अकोला : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगरपालिकांमधील स्वच्छतेच्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर केल्या जाईल. याकरिता केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत शहरांची तपासणी होणार असून, संबंधित नागरी स्वायत्त संस्थांना पूर्वसूचना न देता सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८, २०१९ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगरपालिकांमधील स्वच्छतेच्या कामांच्या मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर केले जाईल. यापूर्वी राज्यातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी शहरांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाने बक्षीस योजना जाहीर केली होती. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ मध्ये राज्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती. अभियानच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना मनाई करून त्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची तपासणी करणे, मोकळ््या मैदानांची पाहणी करण्यासह शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत तपासणी करण्यात आली. तूर्तास स्वच्छ सर्वेक्षण- २०२०च्या तपासणीसाठी क्यूसीआय सरसावली असून, यावेळी संबंधित नागरी स्वायत्त संस्थांना कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता परस्पर स्वच्छतेच्या कामांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.
‘जीआयएस’प्रणालीचा वापर
नागरी स्वायत्त संस्थांमधील स्वच्छतेची तपासणी करताना यापूर्वी संबंधित संस्थांना अवगत केल्या जात होते. त्यामुळे तपासणीसाठी चमू येणार असल्याच्या धास्तीने तीन-चार दिवस पूर्वीपासूनच स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी नेटाने कामाला लागत असल्याचे समोर आले. त्यामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत कोणतीही पूर्वकल्पना न देता क्यूसीआयकडून तपासणी केली जाईल. त्यासाठी ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर केला जाणार असल्याची माहिती आहे.