सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पोलिसांकडून पायमल्ली
By Admin | Updated: February 2, 2016 02:12 IST2016-02-02T02:12:52+5:302016-02-02T02:12:52+5:30
सानंदा अटक प्रकरणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिका-यांमार्फत राज्यपालांना साकडे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पोलिसांकडून पायमल्ली
बुलडाणा: राजकीय षड्यंत्राचे बळी ठरलेले खामगावचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या पाठीशी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस ताकदीने उभी असून, सूडबुद्धीने वागणार्या भाजप सरकारचा निषेध करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याच्या दृष्टीने योग्य ती न्यायोचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी बुलडाणा जिल्हाधिकार्यांमार्फत राज्यपाल यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात नमूद केले आहे की, याप्रकरणी राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश संदिग्ध असल्याची सबब देऊन तपास चालू ठेवण्याबाबतचा पवित्रा घेतला व रविवार ३१ जानेवारी रोजी माजी आमदार सानंदा यांना त्यांच्या राहत्या घरून रात्री ९.१0 वाजताच्या सुमारास अटक केली. पोलीस प्रशासनाची ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होण्याचे दृष्टीने योग्य ती न्यायोचित कार्यवाही करण्यात यावी, या निवेदनाची मागणी करण्यात आली. याप्रसंगी आ.हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे, श्याम उमाळकर, संजय राठोड, लक्ष्मणराव घुमरे आदी उपस्थित होते.