‘सर्वोपचार’मध्ये दोन महिन्यांनंतर औषधांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 01:45 IST2017-05-29T01:45:52+5:302017-05-29T01:45:52+5:30
शासनाकडून अद्याप निधी नाही: दोघांकडूनच पुरवठा सुरू

‘सर्वोपचार’मध्ये दोन महिन्यांनंतर औषधांचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देयके थकल्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील थांबलेला औषध पुरवठा बुधवारी-गुरुवारी काही प्रमाणात करण्यात आला. त्यातून बाह्योपचार कक्षातील गरज भागवणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याची माहिती आहे. पुरवठादारांपैकी दोघांकडून १३ ते १४ प्रकारची औषधे मिळाली आहेत. त्यापैकी काहींनी निधीसाठी पुरवठा थांबवला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.
सर्वोपचारच्या भांडारात १९ औषधांचा साठा संपुष्टात आला होता. पुरवठाच थांबल्याने रुग्णांना बाहेरून औषध विकत आणण्याचे सांगण्यात येत होते. तुटवडा असलेली औषधे जीव वाचविणाऱ्या आहेत. ऐनवेळेवर रुग्णांना ते न मिळाल्यास तो दगावू शकतो. त्यासाठी नातेवाइकांना विकत आणणे भागच पडते. तुटवडा असलेल्या औषधांमध्ये मानसिक रोगी, मधुमेह, रक्तदाब, महत्त्वाची जीवनसत्त्वे, जखमा भरणाऱ्या क्रीम, हृदय, मूत्राशयाचे क्रिटिकल रुग्ण, त्वचा रोगी, गर्भवती महिला, अस्थमा, हृदय बंद पडणारे रुग्ण, घसा, हाडांचे फ्रॅक्चर, शौचास साफ न होणे, आम्लपित्त आणि प्रतिजैविकांचा समावेश आहे. विविध रोगांवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या फियालोपेरिडॉल, ग्लिबेन क्लेमाइड, अॅम्लोडिपाइन, फोलिक अॅसिड, सोफ्रामायसिन क्रीम, फ्रुसेमाइड, फ्लू कॅमेझोल, फेरस सल्फेट प्लस फोलिक अॅसिड, इटोफिलाइन्स आणि थिओफिलाइन, एरिथ्रोमायसिन, डिआॅक्झिन-०.२५, अॅक्लोविरा क्रीम, कॉप्रिमायसिन सिरप, क्लोटोमायसिन, कॅल्शिअम लॅक्टेट, व्हिटामिन डी-५००, बिसाकोडिल, बी-कॉम्प्लेक्स, अॅण्टासिड, अॅमॉक्झिलिन सिरप, अॅम्पिसिलिन यापैकी काही औषधांंचा पुरवठा करण्यात आला आहे. आता रुग्णांना त्याचे वाटप सुरू आहे.
शासनाकडून निधी नाहीच
औषधासाठी शासनाकडून तीन कोटींपेक्षाही अधिक निधीची गरज आहे. त्याची मागणीही सर्वोपचार रुग्णालयातून करण्यात आली; मात्र मार्च अखेरनंतरही निधी मिळालेला नाही.
आता डिसेंबर २०१७ पर्यंत आवश्यक निधीची मागणी आहे. ते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.