सूर्य कोपला!
By Admin | Updated: March 30, 2017 03:19 IST2017-03-30T03:19:37+5:302017-03-30T03:19:37+5:30
तापमान ४४.१ अंश; ‘मार्च हीट’मुळे अकोलेकरांची होरपळ.

सूर्य कोपला!
अकोला, दि. २९- यावर्षी मार्च महिन्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, गत आठवडाभरापासून तापमापीतील पारा सातत्याने वर चढत आहे. सूर्य अक्षरश: कोपल्याने बुधवारी अकोला शहराचे तापमान ४४ अंशांवर पोहचले. पार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ आपल्या कडाक्याच्या उन्हासाठी प्रसिद्ध आहे. तापमानात विदर्भात चंद्रपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. यावर्षीचा उन्हाळा गत काही वर्षांतील तापमानाचे उच्चांक मोडेल, असा कयास हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्याचा प्रत्यय गत आठवडाभरापासून मार्च महिन्यातच येत आहे. गत चार दिवसांपासून शहरासह जिल्हय़ाचे तापमान सातत्याने वाढत असून, पार्याने चाळीशी ओलांडली आहे. बुधवारी अकोला शहरातील तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुधवारी सकाळी ९ वाजता तापमापीतील पारा ३१ अंशांवर होता. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात पारा ४0 - ४२ अशांच्या पुढे सरकतो असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमान ४४ अंशांवर पोहचले आहे. उष्णतेची ही लाट अशीच कायम राहिली, तर येत्या आठवडाभरात पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज आहे.
आणखी दोन दिवस उष्णतेची लाट
विदर्भात गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विदर्भातील सर्व जिल्हय़ांमध्ये २९ ते ३१ मार्च या कालावधीत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
बाजारपेठा सामसूम
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजेनंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
भारनियमनाचे चटके
वाढत्या तापमानाने नागरिक आधीच हैराण झाले असताना, बुधवारी जिल्हय़ात विविध ग्रुपवर आपत्कालीन भारनियमन करण्यात आले. ई, एफ, जी १, जी २, जी ३ या ग्रुपवर टप्प्या-टप्प्याने भारनियमन झाले. यामुळे विविध फिडरवरील वीज पुरवठा कित्येक तास खंडित होता. सायंकाळी ५ वाजता सर्वच ग्रुपवरील भारनियमन मागे घेण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.