खरेदीच्या मुहूर्तालाच ‘सुलतानी’ संकट!
By Admin | Updated: August 30, 2016 01:35 IST2016-08-30T01:35:57+5:302016-08-30T01:35:57+5:30
तेराही बाजार समित्यांमध्ये मुगाचे हमी भाव वा-यावर; शेतकरी हवालदिल.

खरेदीच्या मुहूर्तालाच ‘सुलतानी’ संकट!
गणेश मापारी
खामगाव(जि. बुलडाणा), दि. २९: शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतानाच शेतकर्यांवरील अस्मानी व सुलतानी संकटेही वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर्षी खरिपाच्या मुगाला ५ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला असून, बुलडाणा जिल्ह्यातील तेराही बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दरानेच नवीन मुगाची खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
सतत तीन वर्षे दुष्काळाचा सामना करणार्या शेतकर्यांना यावर्षी पावसाने दिलासा दिला. जुलै महिन्यात खरिपांच्या पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांची चिंता आता वाढली आहे. येत्या तीन ते चार दिवसात पावसाने दमदार हजेरी न लावल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. एकीकडे पाऊस न येण्याचे अस्मानी संकट शेतकर्यांवर आले असतानाच बाजार समित्यांमध्येही मूग खरेदीत कमी भाव मिळत असल्याच्या सुलतानी संकटाचा सामनाही शेतकर्यांना करावा लागत आहे. शासनाने यावर्षी मुगाला प्रति क्विंटल ४८00 रुपये तसेच ४२५ रुपये बोनस असा एकूण ५२२५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी केली जाऊ नये, यासाठी बाजार समित्यांना निर्देश देण्यात आले आहेत; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी एकाही बाजार समितीने हमी भावाचा मुहूर्त साधलेला नाही. चार हजार रुपयेपासून तर ४८00 रुपये प्रति क्विंटल या दरानेच मुगाची खरेदी करण्यात येत आहे. १0 ऑगस्ट नंतर बाजार समितीमध्ये नवीन मूग येण्यास सुरुवात झाली आहे. बुलडाणा बाजार समितीत ५१00 रुपये प्रति क्विंटल दराने मूग खरेदी करण्यात आला; मात्र दुसर्या दिवशीपासूनच मुगाचे भाव ४३00 ते ४८00 रुपयांपर्यंत आले आहे. इतर १२ बाजार समित्यांमध्ये मुगाने ५ हजाराचा भाव पाहिलाच नाही. एकंदरीतच मूग खरेदीमध्ये शेतकर्यांची सर्रास लूट होत असताना बाजार समित्याही ह्यमूगह्ण गिळून बसल्या आहेत.