अवकाळी पाऊस, गारपिटीने पळविला तोंडचा घास
By Admin | Updated: January 2, 2015 01:37 IST2015-01-02T01:37:10+5:302015-01-02T01:37:10+5:30
अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.

अवकाळी पाऊस, गारपिटीने पळविला तोंडचा घास
अकोला: जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तोंडी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पळविल्याने आधीच दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा, बाश्रीटाकळी आणि मूर्तिजापूर या सातही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. तसेच बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी आणि अकोला या चार तालुक्यांमधील ४१ गावांमध्ये गारपीट झाली. गुरुवारीदेखील दिवसभर अवकाळी पाऊस सुरूच होता. दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात तूर, कपाशी, हरभरा, गहू, कांदा, केळी व लिंबू इत्यादी पिकांचे नुकसान झाले. तूर, हरभर्याचा फुलोरा गळून पडला, गहू जमिनीवर लोळला असून, कापसाची बोंडं पावसाने भिजून पडली व लिंबू, केळी गळून पडली. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पळविला. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीच्या स्थितीत आधीच दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेला जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा संकटात सापडला. नापिकीमुळे शेतकर्यांना आधीच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असतानाच, अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने, दुष्काळात तेरावा महिना, असे म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आल्याचा प्रत्यय येत आहे. शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी ४४.६५ मि.मी. पाऊस!
गेल्या चोवीस तासांत गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंंंंत जिल्ह्यात सरासरी ४४.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला ४८.६0, बाश्रीटाकळी ४४, आकोट ३४, तेल्हारा ३४, बाळापूर ७९, पातूर ५५ व मूर्तिजापूर तालुक्यात १८ मि.मी.पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात अतवृष्टी! गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वात जास्त पाऊस बाळापूर तालुक्यात झाला. तालुक्यात ७९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असल्याने, या तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सर्वातधिक पाऊस बाळापूरात झाला आहे.