शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा!
By Admin | Updated: January 31, 2015 00:39 IST2015-01-31T00:39:02+5:302015-01-31T00:39:02+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश; जिल्हास्तरीय समितीची बैठक.

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल सादर करा!
अकोला : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन, ५ फेब्रुवारीपर्यंंत अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीच्या सभेत संबंधित अधिकार्यांना दिले.
अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे, त्यामुळे वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा व इतर प्रकारची माहिती घेऊन आणि त्याआधारे प्रकरणे तयार करण्यात यावे, या प्रकरणांवर पास, महानगरपालिका, नगरपालिका,ग्रामपंचायत या संबंधित यंत्रणांचा अभिप्राय घेऊन, सविस्तर माहितीचा अहवाल येत्या ५ फेब्रुवारीपर्यंंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी या बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिले.
जिल्हास्तरीय समितीच्या या बैठकीला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपाचे प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.