अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी अद्ययावत करून तातडीने सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या निवडणूक नायब तहसीलदारांना दिले.
जिल्हा परिषदेचे १४ गट आणि सात पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलैला मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समित्यांच्या गणांतील मतदान केंद्रांची अद्ययावत यादी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभागाचे प्रभारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांच्या निवडणूक नायब तहसीलदारांना दिले. मतदान केंद्रांच्या अद्ययावत याद्यांना मान्यता देण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात येणार आहेत.