वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंची मुजोरी
By Admin | Updated: October 19, 2014 01:13 IST2014-10-19T01:12:11+5:302014-10-19T01:13:52+5:30
अकोला जिल्हा रूग्णालयातील प्रकार, दिवसभर रुग्ण ताटकळत, प्रशासनाचाही वचक नाही.

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंची मुजोरी
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुजोर विद्यार्थ्यांंनी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला न जुमानता शुक्रवारपासून संप पुकारल्याने येथे उपचारासाठी आलेल्या व दाखल असलेल्या रुग्णांना शनिवारी उपचाराविनाच ताटकळत राहावे लागले. वाडेगाव येथील एका युवकाचा प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर, पोलिस व नातेवाइकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यासाठी डॉक्टरांनी हा संप पुकारला असून, रुग्णांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. वाडेगाव येथील रहिवासी अवी सोनोने याने शुक्रवारी सकाळी विष प्राषण केले. अवीला तातडीने सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात भरती केले तेव्हा अवी सुस्थितीत होता. भरती केल्यानंतर अवीला डॉक्टरांनी सलाईन लावले; मात्र त्यानंतर कोणतेही उपचार केले नाही. अवीच्या नातलगांनी डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती वारंवार केली; मात्र डॉक्टर लक्ष देत नसल्याचे पाहून, नातलग चिडले. याच मुद्यावर त्यांच्यात वादही झाले; परंतु वादविवादापेक्षा उपचार महत्त्वाचे असल्याने नातलगांनी अवीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथील डॉक्टरांनी अवीला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात आणला. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांंनी अवीचा मृतदेह असलेले वाहन रुग्णालयात अडविले. त्यामुळे मृताचे नातेवाईक आणि डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांंमध्ये पुन्हा वाद झाला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सवरेपचार रुग्णालय गाठून डॉक्टरांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी पोलिसांशीही वाद घातला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्याची विनंती डॉक्टरांना केली; तरीही डॉक्टरांसह विद्यार्थ्यांंनी आधी लाठीचार्ज करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करा आणि मगच शवविच्छेदन करू, अशी मागणी करीत संप पुकारला. शुक्रवारी दुपारपासून सुरू केलेला संप शनिवारीही मागे न घेता या मुजोर विद्यार्थ्यांंंनी रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रताप केला. रुग्णांचे प्राण वाचविणार्या डॉक्टरच्या अशा वागणुकीमुळे डॉक्टरी पेशाला कलंक लावण्यात येत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयात रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहून अधिष्ठाता डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांंना संप मागे घेण्याचे सांगितले; मात्र विद्यार्थ्यांंंनी त्यांचा आदेश धुडकावून लावला. शनिवारीही संप कायम ठेवल्याने रुग्णालयातील शेकडो रुग्णांचे प्रचंड हाल सुरू होते. एकाही रुग्णावर उपचार होत नसल्याने या ठिकाणी रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती; मात्र प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला.