विद्यापीठाच्या गुंतागुंतीच्या परीक्षा पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान!
By Admin | Updated: May 11, 2017 07:24 IST2017-05-11T07:24:00+5:302017-05-11T07:24:00+5:30
विद्यापीठावर ताण: कला, वाणिज्य प्रथम वर्षाची परीक्षा ‘सेमिस्टर’ पद्धतीने.

विद्यापीठाच्या गुंतागुंतीच्या परीक्षा पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान!
अकोला : राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयातर्फे घेण्यात येतात आणि अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठ घेते; परंतु आपल्या विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा घेण्याची पद्धत जगावेगळी असून, अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडत असल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने मुंबई, पुणे विद्यापीठानुसार परीक्षा पद्धती राबविण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली.
अमरावती विद्यापीठात बीएससी, एमएससी, एमकॉम, बीएससी(गृह विज्ञान) शाखेच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होत आहेत. विद्यापीठाने गृह विज्ञान शाखेत पहिली, तिसरी आणि पाचव्या सेमिस्टरची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घ्यायला हवी आणि दोन, चार, सहाव्या सेमिस्टर परीक्षा अमरावती विद्यापीठ स्तरावर घ्यावी. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या विद्यापीठांमध्ये प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालये घेतात. मुंबई विद्यापीठात प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय घेते आणि अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येते; परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा घेण्याची पद्धती अगदी उलट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इतर विद्यापीठांमधील परीक्षा पद्धती अमरावती विद्यापीठाने स्वीकारली, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होईल, असे शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
यावर्षीपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कला व वाणिज्य प्रथम वर्षाच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे आणि या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. त्यामुळे सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेताना अमरावती विद्यापीठाने पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या विषयाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे द्यावी आणि परीक्षा घेताना प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये. दोन, चार आणि सहा विषयांच्या परीक्षा विद्यापीठाने घ्यायला हव्यात, असे शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सेमिस्टर पद्धतीने परीक्षा विद्यापीठ घेणार असल्याने विद्यापीठ व कर्मचाऱ्यांवर परीक्षेचा ताण पडणार आहे. त्यामुळे विद्यापीठ फक्त परीक्षा घेण्याचे केंद्र होईल आणि परीक्षांचे निकालही उशिरा लागतील, अशी भीती शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सेमिस्टर परीक्षेमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या विषयाची परीक्षा महाविद्यालयांनी घ्यावी, त्यात प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये. दोन, चार आणि सहा विषयांच्या परीक्षा अमरावती विद्यापीठाने घ्याव्यात, तरच विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे जाईल.
- प्रा. डॉ. सुभाष भडांगे,
प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला.
त्यामुळेच विद्यार्थी धरतात मुंबई, पुण्याची वाट
महाराष्ट्रामधील विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. महाराष्ट्रामधील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाला एकच विषय असतानाही त्या विद्यापीठांचा दर्जा टिकून आहे. अमरावती विद्यापीठामध्ये वर्षाला तीन विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडतो. त्याला एका विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळतच नाही. अनेक विद्यार्थी नापास होतात. पुढे शिक्षण सोडतात, तर काही गुणवंत विद्यार्थी मुंबई, पुण्याची वाट धरतात.
ड्रॉपआऊट रेसो सर्वाधिक
अमरावती विद्यापीठाच्या अत्यंत क्लिष्ट परीक्षा पद्धतीमुळे ७० टक्के विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झाल्यास शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. विद्यार्थ्यांचा ड्रॉपआऊटचा रेसो थांबवायचा असल्यास, सेमिस्टर परीक्षेची जबाबदारी महाविद्यालयांकडे देऊन अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठाने घ्यावी आणि विषयांची संख्या कमी करावी, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.