विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके आली; शाळा स्तरावर वाटप सुरू
By Admin | Updated: June 6, 2014 01:17 IST2014-06-06T01:17:04+5:302014-06-06T01:17:25+5:30
अकोला महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची शालेय पाठय़पुस्तके प्राप्त झाली;शाळा स्तरावर वाटप सुरू

विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके आली; शाळा स्तरावर वाटप सुरू
अकोला : महानगरपालिकेच्या मराठी, उर्दू व हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची शालेय पाठय़पुस्तके प्राप्त झाली असून, शाळा स्तरावर पुस्तकांचे वाटप सुरू झाले आहे. गुरुवारी रामदास पेठस्थित मराठी मुलांची शाळा क्र.४ टेम्पल गार्डन येथे मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे संबंधित मुख्याध्यापकांना वितरण करण्यात आले.
महापालिकेच्या अधिनस्त शाळांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी माध्यमाचे इयत्ता पहिली ते ८ वी पर्यंत ८ हजार ४0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येत्या २६ जूनपासून शालेय सत्राला सुरुवात होणार आहे. त्यानुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांची पाठय़पुस्तके व स्वाध्याय पुस्तिका सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झाली आहेत. यामध्ये मराठी माध्यमासाठी १२ हजार ९३0 पुस्तकांची मागणी केली असता सर्व पुस्तके प्राप्त झाली. हिंदी माध्यमासाठी ५ हजार ६२७ पुस्तके प्राप्त झाली असून, वर्ग ३ रा परिसर अभ्यास, वर्ग ६ वा इतिहास व वर्ग ७ वा सामान्य विज्ञान या विषयाची ३४९ पुस्तके मिळणे बाकी आहे. उर्दू माध्यमाच्या एकूण १७ हजार ९७४ पुस्तकांपैकी १४ हजार ७७३ पुस्तके मिळाली असून, वर्ग ३ रा परिसर अभ्यास, वर्ग ४ था बालभारती तसेच परिसर अभ्यास व गणित या विषयाची ३ हजार २0१ पुस्तके अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. शैक्षणिक सत्र सुरू होण्याचा कालावधी लक्षात घेता, गुरुवारी मनपा मराठी मुलांची शाळा क्र.४ येथे मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
संबंधित मुख्याध्यापकांना सहाय्यक आयुक्त अनिल बिडवे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र ढवळे, प्रभारी लेखाधिकारी मो.अन्वर हुसेन, केंद्र समन्वयक हबीबुर्ररहमान यांनी पुस्तकांचे वितरण केले. उर्दू व हिंदी माध्यमाच्या पुस्तकांचे अनुक्रमे ६ जून व ७ जून रोजी वितरण केले जाईल.