आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होरपळ !
By Admin | Updated: September 7, 2015 00:04 IST2015-09-07T00:04:17+5:302015-09-07T00:04:17+5:30
मेहकर तालुक्यातील आश्रम शाळा दुर्लक्षीत; शैक्षणिक साहित्यापासून विद्यार्थी वंचीत.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होरपळ !
मेहकर (जि. बुलडाणा) : आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात ५४७ आश्रमशाळा असून यामध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहे. बहुतांश आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राचे शैक्षणिक साहित्य अद्यापपर्यंत मिळाले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य शासनाने १९७२ मध्ये आदिवासी विकास विभागाने आदिवासी अपर आयुक्त कार्यालयांतर्गत नाशिक विभागात २२२, ठाण्यात १२३, अमरावतीत १00 आणि नागपूर येथे १0२ अशा एकूण ५४७ आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आज रोजी राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये १ लाख ८७ हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात भाजीपाला, अन्नधान्य, शालेय साहित्य, बूट, गणवेश आदी सुविधा दिल्या जातात; मात्र नवीन शैक्षणिक सत्र २0१५-१६ चालू होवून तीन महिण्याचा काळ लोटला, तरीही आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, कंपासपेटी, रंगपेटी, पाटी, पेन्सिल, फुटपट्ट्या, गणवेशासाठी कापड, बूट मिळालेले नाहीत. धान्य, शालेय साहित्य, गणवेश आणि बूट यांची खरेदीची निविदा प्रक्रिया ३१ मेपयर्ंत पूर्ण होणे अपेक्षित आहे; मात्र आदिवासी विकास विभागातील नियोजनाअभावी या सर्व निविदा प्रक्रिया खोळंबल्या आहेत. त्याचा नाहक त्रास स्थानिक प्रशासन आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच राज्यातील आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांची शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने बर्याच आश्रमशाळांत शिक्षकच नसल्याचे वास्तव आहे. दुर्लक्षीत आदिवासी आश्रम शाळांमध्ये अपुर्या शैक्षणिक सुविधा, तुटपुंजे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचा अभाव असल्याने विद्याथ्याच्या समस्या वाढल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
आदिवासी विद्यार्थ्यांंचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पुरवठा करण्यात येणारी दूध, केळी, अंडी, सफरचंद जवळपास १ ऑगस्टपासून बंद आहे. प्रशासनाचे आदेश असतानाही अनेक आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा पोषक आहार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांंचे आरोग्य धोक्यात आले आहे.