भरधाव ट्रकने तरुणीस चिरडले!
By Admin | Updated: April 1, 2016 00:54 IST2016-04-01T00:54:27+5:302016-04-01T00:54:27+5:30
आकोट - हिवरखेड मार्गावरील अडगाव फाट्यावरील अपघात; चालकाला तात्काळ अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी.

भरधाव ट्रकने तरुणीस चिरडले!
अडगाव खुर्द / रुईखेड (ता. आकोट): पीर बाबाच्या दर्शनाकरिता वडिलांसोबत जात असलेल्या तरुणीचा ट्रकने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. ही घटना आकोट - हिवरखेड मार्गावरील अडगाव खुर्द फाट्यावर गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. चालकाला अटक करण्याच्या मागणीसाठी चार तास मृतदेह घटनास्थळावरून हलवू दिला नाही. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तालुक्यातील मार्डी या आदिवासीबहुल भागातील शंकर लाला मोरे हे त्यांची १९ वर्षीय मुलगी जमुना हिच्यासोबत एम एच २७ के ८४९ क्रमांकाच्या मोटारसायकलने गोर्धा येथे पीर बाबांच्या दर्शनाकरिता जात होते. यावेळी अडगाव खुर्द फाट्यावर रस्त्याच्या कडेला उभे असताना एम एच १४ बी जे २५५३ क्रमांकाच्या ट्रकने जमुना हिला धडक दिली. त्यामध्ये तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. जमुना हिच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. आकोटवरून अडगावकडे जाणार्या या ट्रक चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून ट्रक न थांबविता तो पळून गेला. हा ट्रक अडगाव बु. या ठिकाणी पकडण्यात आला. आकोट ग्रामीण पोलिसांनी शंकर लाला मोरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक आरोपी जहीरबेग जमीरबे (२५, रा. पंचगव्हाण) विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, सदर ट्रक हा अडगाव बु. येथील लखनलाल प्रतापसिंह ठाकूर यांचा असल्याचे आकोट ग्रामीण पोलिसांनी सांगितले.